शाळा (कादंबरी)

शाळा
लेखक मिलिंद बोकील
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती जून १४, इ.स. २००४
मुखपृष्ठकार चंद्रमोहन कुलकर्णी
पृष्ठसंख्या ३०३
आय.एस.बी.एन. ८१-७४८६-४१५-६

शाळा ही मिलिंद बोकील यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. साधारणत: इ.स. १९७५ साली, इयत्ता नववीत शिकणाऱ्या, पौंगडावस्थेतल्या चार शाळकरी मित्रांच्या आयुष्यात त्या एका वर्षात घडलेल्या घटनांभोवती कादंबरीचा पट विणला आहे. कादंबरीत शाळेत आणि कथानायकाच्या चाळीत घडणाऱ्या घटनांच्या अनुषंगाने इ.स. १९७५ साली भारतात लागू झालेल्या देशांतर्गत आणीबाणीचेदेखील संदर्भ येतात.

कथानक

मुकुंद जोशी हा कथानायक सुखदेव नामदेव वऱ्हाडकर हायस्कूल या शाळेत इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी आहे. त्याचा मित्र सुरेश म्हात्रे उर्फ सुऱ्या याच्या वडिलांनी शाळेच्या वाटेवर बांधायला काढलेल्या इमारतीमध्ये शाळा भरण्याआधी मुकुंद, सुऱ्या, चित्र्या आणि फावड्या असे चौघे मित्र जमून येणाऱ्या-जाणाऱ्या सहाध्यायिनींची लपून राहून अश्लील भाषेत टिंगल करणे, उरलेला गृहपाठ एकमेकांच्या मदतीने पुरा करणे, इत्यादी गोष्टी करतात. पौगंडावस्थेतल्या या मुलांच्या मनात वर्गातील/शाळेतील मुलींविषयी आकर्षण आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचे लक्ष वेधून घेण्यासाठी निरनिराळ्या गोष्टी करणे, त्या व्यक्तीने तसाच प्रतिसाद दिल्याचा आनंद व एकीकडे या नात्याच्या भविष्याविषयी मनात निर्माण होणारा संभ्रम, आवडत्या व्यक्तीने दिलेल्या नकारातून उद्भवणारी निराशा, यांखेरीज त्या व्यक्तीने शाळेत तक्रार केल्याने उद्भवणारे प्रकरण व शिक्षा, असे अनेक प्रसंग मुकुंदाच्या नजरेतून मांडत कादंबरी पुढे सरकते.

मुकुंदाच्या बहिणीला त्यांच्याच चाळीत राहणाऱ्या विजयाबद्दल वाटणारे आकर्षण, अनिता आंबेकर या शाळेत नव्याने आलेल्या विद्यार्थिनीचे शिक्षकाच्या प्रेमात पडणे, आणि त्या प्रकरणातून तिने आत्महत्येचा प्रयत्न करणे, मुकुंदाला जिवलग मित्रासारखा वाटणारा त्याचा नरुमामा, महेश व सुकडीचे प्रेमप्रकरण, चित्र्या व त्याचा भाऊ राजू यांना सांभाळायला ठेवलेली देवकी नावाची चळलेली बाई इत्यादी उपकथानके कादंबरीत येतात.

नववीच्या परीक्षेचा निकाल लागतो. कादंबरीची नायिका शिरोडकर ही वडिलांची बदली झाल्याने गाव सोडून गेल्याचे मुकुंदाला समजते. तिची भेट न होण्याचा व आधीच्या काही प्रसंगांतून झालेले गैरसमज दूर करता न आल्याचा सल मुकुंदाच्या मनात राहणे, बरोबरीचे काही मित्र नापास झाल्याने, चित्र्याचे कुटुंब बांद्र्याला हलणार असल्याचे समजल्याने शाळेतले आधीचे हवेहवेसे दिवस संपून दहावीच्या वास्तवाच्या वळणाशी मुकुंदाला आणून सोडत कादंबरी संपते.

चित्रपट

१९७० साली लिहिलेल्या शाळा या कादंबरीवर २०१२ मध्ये मराठी चित्रपटदेखील बनवण्यात आला आहे. दिग्दर्शक: सुजय डहाके. संगीत : अग्नी बॅन्ड. पार्श्वसंगीत : बेन पॅटन(न्यूयोर्क) कलाकार: केतकी माटेगावकर, अमृता खानविलकर, संतोष जुवेकर

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!