वेस्टर्न ऑस्ट्रेलिया हे ऑस्ट्रेलिया देशामधील आकाराने सर्वात मोठे राज्य आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या उत्तर व पश्चिमेस हिंदी महासागर, दक्षिणेस दक्षिणी महासागर तर पूर्वेस नॉर्दर्न टेरिटोरी व साउथ ऑस्ट्रेलिया ही राज्ये आहेत. २५,२९,८७५ चौरस किमी इतक्या क्षेत्रफळाच्या भूभागावर वसलेले वेस्टर्न ऑस्ट्रेलिया रशियाच्यासाखा प्रजासत्ताक खालोखाल जगातील दुसरा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. येथील बव्ह्ंशी भूभाग वाळवंटी व निर्मनुष्य असून २४ लाख लोकसंख्येचा मोठा हिस्सा राज्याच्या नैऋत्य कोपऱ्यात एकवटला आहे. पर्थ ही वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रूम हे उत्तरेकडील पर्यटनासाठी एक लोकप्रिय गाव आहे.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था खाणकाम, शेती व पर्यटनावर अवलंबून असून ऑस्ट्रेलियाच्या एकूण धातू निर्यातीमधील ५७ टक्के वाटा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडे आहे. येथील वार्षिक दरडोई उत्पन्न ऑस्ट्रेलियामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.