विनय सहस्रबुद्धे हे संसद सदस्य असून राज्यसभेमध्ये ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशी जबाबदारी आहे. तसेच ते राजकीय विचारवंत व नैमित्तिक स्तंभलेखक म्हणून सुद्धा ओळखले जातात. ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे महासंचालक आहेत. भारतीय जनता पक्षाचे वैचारिक धोरण ठरविणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी सहस्रबुद्धे हे एक मानले जातात. सन २००९ मध्ये सहस्रबुद्धे यांना त्यांच्या ‘Political Parties as Victims Of Populism and Electoral Compulsions : A Quest for Systemic Solutions’ प्रबंधासाठी मुंबई विद्यापीठाकडून पी एच डी प्रदान करण्यात आली.
सामाजिक जीवन
विनय सहस्रबुद्धे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेच्या कामाद्वारे सामाजिक जीवनास प्रारंभ केला. १९८३ ते ८५ या कालावधीमध्ये त्यांनी विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम केले. [१][२] १९८८ साली त्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेची धुरा हाती घेतली. तब्बल १८ वर्षे इतका प्रदीर्घ काळ ते मुंबई विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून कार्यरत होते. [३] ते अहमदाबाद येथील सरदार पटेल प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या संचालन मंडळाचे सदस्य आहेत. २००२ साली अफगाणिस्थान तालिबान्यांच्या तावडीतून मुक्त झाल्यावर सर्वात प्रथम गेलेल्या भारतीय सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी शिष्ट मंडळाचे त्यांनी नेतृत्व केले होते. [४] मुंबईतील प्रतिष्ठित एशियाटिक सोसायटी या २०८ वर्षे जुन्या ग्रंथालयाच्या कार्यकारिणीचे ते उपाध्यक्ष आहेत. [५] चतुरंग प्रतिष्ठानच्या वर्ष २०१३ च्या २३ व्या जीवनगौरव पुरस्कार निवडसमितीचे सहस्रबुद्धे अध्यक्ष होते. [६]
राजकीय सहभाग
सहस्रबुद्धे हे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे वैचारिक धोरण ठरविणाऱ्या व्यक्तींपैकी एक मानले जातात. [७][८] २००९ साली जेंव्हा नितीन गडकरी यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली तेंव्हा सहस्रबुद्धे यांनी गडकरीचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिले. [९] भारतीय जनता पक्षामध्ये सुशासन ही संकल्पना रुजावी म्हणून २०१० साली त्यांनी भाजप शासित राज्यांच्या सुमारे १२५ मंत्र्यांचे प्रशिक्षण केले. [१०] २०१२ साली भाजपचे जेष्ठ विचारवंत स्वर्गीय बाळ आपटे यांच्या निवृत्तीने रिकाम्या झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून सहस्रबुद्धे यांचे नाव चर्चेत होते, परंतु ती खासदारकीची जागा गडकरींचे निकटवर्तीय मानले जाणारे संचेती यांना देण्यात आली.[११][१२] २०१४ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीकरिता भाजपचे व्हिजन डॉक्युमेण्ट तयार करण्याची जबाबदारी असलेल्या समितीवर त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.[१३]
साहित्य व लेखन
सहस्रबुद्धे हे विविध इंग्लिश व मराठी नियतकालिके व वृत्तपत्रांमधून नैमित्तिक स्तंभलेखन करीत असतात. [१४][१५] लोकशाही शासन पद्धती मध्ये कालानुरूप व्यापक सुधारणा होणे गरजेचे आहे असे त्यांचे मत[१६]असून या विषयावर त्यांनी "आहे लोकतंत्र तरीही" हे पुस्तक लिहिले आहे.[१७][१८] जून २०१२ मध्ये याच विषयावरील त्यांचे इंग्लिश पुस्तक "बियोण्ड अ बिलियन बॅलट्स" हे पुस्तक श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.[१९] 1998 साली त्यांनी सहसंपादित केलेल्या "निवडक माणूस" या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता.