कवी वामन भार्गव पाठक (जन्म: १९ ऑगस्ट १९०५, मृत्यू: २७ जानेवारी १९८९[१]) हे मराठीतील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक आणि साहित्यिक होते. 'प्रवासी', 'मानवता', 'ओढणी; ही त्यांची खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत. पुण्याच्या नौरोसजी वाडिया महाविद्यालयात १९३९ ते १९६८ अशी २९ वर्षे ते प्राध्यापक होते.
प्रवासी, ओढणी ही त्यांची खंडकाव्ये जीवनविषयक चिंतन मांडणारी आहेत.
पाठक यांची कविता साधी, प्रासादिक, लौकिक जीवनातील अनुभूती शब्दबद्ध करणारी आहे.
शिवराज आणि बालवीर
'शिवराज आणि बालवीर' या बालगीताने ते प्रसिद्धीस आले. गीताची पहिली ओळ "खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या.." ही खूपच लोकप्रिय आहे. पाठक यांच्या "आशागीत" या १९३३ साली प्रकाशित झालेल्या निवडक कवितांच्या संग्रहात हे स्फूर्तिगीत समाविष्ट करण्यात आले आहे. हा कविता संग्रह पुणे नगर वचन मंदिर येथे उपलब्ध आहे.[२]
डॉ. नीरज देव त्यांच्या "शिवराज आणि बालवीर- स्मरणाआड न जाणारे गीत"[३] या लेखात कवितेचे मर्म उलगडून दाखवताना लिहितात की, " या कवितेत सावळ्या स्वतःला आणि महाराज त्याला नौकर नाही 'चेला' म्हणतात. हे खूप सूचक आहे. नौकर जन्मभर नौकरच राहतो, तर चेला 'गुरुत्वा' ला पोचण्याचा अधिकार बाळगतो. ज्याकाळात राजाला मालक अन् सेवकाला गुलाम मानले जाई त्याकाळात चेल्याचे नाते निर्माण करीत स्वराज्याचे व्रतच महाराज पुढील पिढ्या न् पिढ्यात संक्रमित करत होते, हे कवीने अचूक चितारले."