रमेश रासकर हे अमेरिकेत मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे प्राध्यापक असून एमआयटी मीडिया लॅब्सच्या कॅमेरा कल्चर संशोधन गटाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नावावर पन्नासपेक्षा जास्त पेटंट आहेत.
बालपण आणि शिक्षण
रमेश रासकर यांचा नाशिकमध्ये एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेतून झाले. पुढे अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या परीक्षेमध्ये ते महाराष्ट्रात पहिले आले. त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. पुण्यात शिकत असताना त्याकाळी नुकताच प्रकाशित झालेला ज्युरासिक पार्क हा सिनेमा रासकर यांनी पाहिला. त्यातील संगणक ग्राफिक्स पाहून ते अतिशय प्रभावित झाले आणि त्यांना त्या क्षेत्रात आवड निर्माण झाली. त्याकाळी भारतात या क्षेत्रात शिकण्याच्या खूप कमी संधी उपलब्ध असल्याने त्यांनी अमेरिकेतील सर्वोत्तम संगणक ग्राफिक्स विभाग असलेल्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तेथून पीएचडी पदवी मिळवली.[१]
संशोधन
रासकर २००७ साली एमआयटी मीडिया लॅब्समध्ये रुजू झाले. रासकर यांनी त्या प्रयोगशाळेत फेम्टो-फोटोग्राफीचे तंत्र वापरून दर सेकंदाला एक हजार अब्ज (~१०१२) फ्रेम या वेगाने छायाचित्रे घेऊ शकणारा अतिशय गतिमान असा फेम्टो-कॅमेरा विकसित केला. हा वेग इतका जास्त आहे की, त्यामुळे प्रकाश किरणांचा/फोटॉन्सचा एखाद्या माध्यमातील प्रवाससुद्धा पाहता येऊ शकतो.[२] त्यांनी लेसर प्रकाशाचे बर्स्ट्स वापरून कोपऱ्यांच्या भोवती पाहू शकणारा कॅमेरादेखील विकसित केला आहे.[२][३] याव्यतिरिक्त स्मार्टफोनद्वारे चष्म्याचा नंबर शोधणे, पुस्तक न उघडताच त्यातील मजकूर वाचणे, एक्स-रे शिवाय शरीराच्या अंतर्भागाचे निरीक्षण करणे आणि दाट धुक्यातून गाडी सहजपणे चालवणे इत्यादींसाठीचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले आहे.[४]
पुरस्कार
त्यांना २००४ साली टेक्नॉलॉजी रिव्ह्यू कडून टीआर१०० हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार ३५ वर्षापेक्षा कमी वयाच्या सर्वोत्तम १० संशोधकांना देण्यात येतो.[५] सप्टेंबर २०१६ मध्ये रासकर यांना प्रतिष्ठेचा लेमेलसन एमआयटी पुरस्कार जाहीर झाला आहे.[६][७] ५ लाख डॉलर (३.३५ कोटी रु.) ही या पुरस्काराची रक्कम आहे.[८]
बाह्य दुवे
संदर्भ