पानवेल

भारतातील विड्याचे दुकान

पानवेल (नागवेल, नागवल्ली, म. हिं. गु.: पानवेल,पान क.: यल्ली बळ्ळी सं.: नागवल्ली, तांबूली इं.: बीटल व्हाइन, बीटल पेप्पर लॅ.: पायपर बीटल; कुल-पायपरेसी) ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. हिच्या पानांपासून विडे करतात. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही एक लागवडयोग्य वेल आहे. याचे पान विडा करण्यासाठी वापरतात. भोजनोत्तर विडा खाल्याने भोजनाचे निट पचन होते.विडा करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यात त्रयोदशगुणी विडा प्रसिद्ध आहे.

पानांचा मुख्य उपयोग तांबुलाकरिता असल्याने त्याकरिता फक्त नर वेलीची लागवड विशेषेकरून करतात. पाने सुगंधी, पाचक, वायुनाशी व उत्तेजक असून पानांतील बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल जंतुनाशक असते. तहान शमविण्यासाठी व मस्तकातील रक्ताधिक्य कमी करण्यास पानांचा रस उपयुक्त असतो. डोके दुखत असल्यास व रातांधळेपणात पानांचा रस वापरतात. फळे मधाबरोबर कफ विकारांत देतात. पाने फुप्फुसाच्या विकारांतही गुणकारी असून गळू व सूज यांवर त्यांचे पोटीस बांधतात. विड्याचे पान हे विशेषकरून जड अथवा पोटभर जेवणा नंतर खायला हवे. अधिक पान खाणे हानिकारक असल्याचे आढळले आहे. काळ्या मिरीबरोबर नागवेलीच्या कोवळ्या मुळांचे चूर्ण घेतल्याने स्त्रियांना गर्भधारणा टाळणे शक्य असते.[]

भोजनानंतर खावयाचे विड्याचे पान

मूळ स्थान

याचे मूळ स्थान जावा बेटे आहे. त्यानंतर ती जगभरात गेली.

लागवड

यासाठी भुसभुसीतजमीन व सुपीक जमीन हवी. भारताच्या दक्षिण भागात मलबार प्रदेशात, आणि बंगाल, गुजरात, महाराष्ट्रामधे नागवेलीची शेती होते.

पिकास योग्य हवामान

या पिकासाठी उबदार व दमट हवामान उत्तम आहे. अति पाऊस होतो, तेथे याचे मळे चांगले टिकतात. क्वचितच हे मिश्र पीक म्हणूनही लावतात. हिला अल्कधर्मी अथवा क्षारीय (अल्कलाइन) जमीन चालत नाही.

जाती

निरनिराळ्या राज्यांत नागवेलीचे निरनिराळे सु. ३५प्रकार लागवडीत आहेत. यांपैकी महाराष्ट्रात गंगेरी, कुऱ्हे, नाबकर, पांढरी, काळी, बांगला आणि कपुरी या प्रकारांची लागवड होते. गंगेरी व पांढरी हे प्रकार सांगली व इस्लामपूर भागात लागवडीत आहेत आणि नाबकर हा प्रकार ठाणे जिल्ह्याच्या वसई भागात आहे. नागपूर व रामटेक भागांत काळी आणि पुणे भागात काळी व कुऱ्हे हे दोन प्रकार लागवडीत आहेत. काळी प्रकाराची पाने जाड आणि काळ्या रंगाची असून कुऱ्हे प्रकारातील पाने नाजूक असतात. नाबकरची पाने लांब व टोकाकडे निमुळती असतात. गंगेरी प्रकाराची पाने काळपट हिरवी व खाण्यास चवदार असतात. बांगलाची पाने जाड व तिखट आणि कपुरीची पाने मध्यम जाड व तिखट असतात.[]

उत्पादनाच्या प्रदेशावर आधारलेले पानांचे पुढील प्रकार ओळखले जातात : ‘देशी’ (स्थानिक), ‘मघई’ (बिहार), ‘बांगला’ (पं. बंगाल), ‘जगन्नाथी’ (ओरिसा) व ‘कपुरी’ (तमिळनाडू). आंध्र प्रदेशात पहिल्या प्रतीच्या पानांना ‘कळ्ळी’, दुसऱ्या प्रतीस ‘पापडा’ व मध्यम प्रतीस ‘कळगोठा’ म्हणतात. ‘कळ्‌ळी’ प्रकार बाजूच्या फांद्यांवरील पानांचा असून त्यांचा मुख्यतः उपयोग स्थानिक असतो पापडा प्रकारची मोठी पाने निर्यात करतात. सालेम जिल्ह्यात (तमिळनाडू) ‘मार’ पाने कोवळी व बाजूकडील असून ‘चक्कई’ प्रकार मुख्य खोडावरील जून पानांचा असतो. याशिवाय उत्पादनाच्या प्रदेशावरून वा अन्य कारणाने रामटेकी, बनारसी, सांची, कपुरी, मालवी, मंगेरी इ. प्रकारांची नावेही प्रचलित आहेत.[]

बाह्य दुवे

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ a b c "नागवेली". मराठी विश्वकोश. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!