विलेम दुसरा (डिसेंबर ६, इ.स. १७९२ - मार्च १७, इ.स. १८४९) हा जानेवारी २०, इ.स. १८४० ते मृत्युपर्यंत नेदरलँड्सचा राजा होता.
विलेम पहिला व विल्हेमिनाच्या या मुलाचा जन्म द हेग येथे झाला. जन्माच्या वेळी विलेम आपल्या देशात नव्हता.
शिक्षण पूर्ण केल्यावर तो ब्रिटिश सैन्यात रूजु झाला व ड्यूक ऑफ वेलिंग्टन बरोबर त्याने काही लढायांमध्येही भाग घेतला.
इ.स. १८१३मध्ये विलेम पहिला नेदरलँड्सचा राजा म्हणून परतला व विलेम दुसरा युवराज म्हणून त्याच्याबरोबर स्वदेशी आला. यानंतर त्याने क्वात्रे ब्रासची लढाई व वॉटरलुची लढाईत भाग घेतला. तेथे तो जखमी झाला.
इ.स. १८१६मध्ये त्याने रशियाचा झार अलेक्झांडर पहिला याची बहीण ऍना पाव्लोव्नाशी लग्न केले.
इ.स. १८४०मध्ये विलेम पहिल्याने पदत्याग केला व विलेम दुसरा राजा झाला. इ.स. १८४८च्या सुमारास युरोपच्या बऱ्याच देशांमध्ये क्रांतिचे वारे वाहत होते. विलेमला भीती वाटली की नेदरलँड्सची प्रजा देखील त्याच्या विरुद्ध उठाव करेल. या कारणास्तव त्याने नेदरलँड्सचे संविधान बदलण्याचा निर्णय घेतला व आपल्याकडील सत्ता कमी करून लोकप्रतिनिधींकडे काही जबाबदाऱ्या दिल्या.
मृत्युपूर्वी त्याने नेदरलँड्सची पहिली संसद खुली केली.