दुसरा चामराज वोडेयार तथा दुसरा चामराजरा वोडेयार (राजा हिरिया अबिरल चामराजरा वोडेयार; १४६३- १५१४) हा १४७८ ते १५१३ पर्यंत म्हैसूर राज्याचा चौथा राजा होता.
विजयनगरचा सामंत
हा आपले वडील पहिला तिम्मराज वोडेयार याच्या मृत्युनंतर राजा झाला. दुसऱ्या चामराजाने ३५ वर्षे अखंड राज्य केले. यातील बराच काळ हा विजयनगरचा सामंत राजा होता. याने आपल्या सत्ताकाळात विजयनगरमध्ये तीनवंशाचे आठ सम्राट सिंहासनावर बसलेले पाहिले. एकीकडे मुघल, दख्खनी सल्तनती आणि पोर्तुगीजांनी विजयनगर साम्राज्यावर चालवलेले हल्ले आणि विजयनगरमधील सिंहासनासाठीची रस्सीखेच, यांमध्ये मैसुरुमध्ये स्थैर्य ठेवण्यात याची मदत झाली.
विजयनगरातील सत्तासंघर्ष
विजयनगरचा सम्राट दुसऱ्या विरूपाक्षाच्या मृत्यूनंतर संगम राजवंशाचा प्रौढराया सिंहासनावर बसला. त्याच्या दरबारातील सरदार हे पसंत नव्हते. प्रौढरायाचा सेनापती सलुवा नरसिंह देव रायाने त्याला पदच्युत करून स्वतः सम्राट झाला. सलुवा राजवंशाच्या तीन पैकी हा पहिला सम्राट होय.
यापूर्वी सुमारे एक शतकापूर्वी संगम सम्राटांनी दिलेल्या जहागिरीला स्मरून मैसुरुचे राजे संगम सम्राटांचे अनुयायी होते. इतर जहागीरदार व इनामदारही याच मार्गाने जात होते.
विजयनगरमधील सत्तासंघर्षाचा फायदा घेत ओडिशाच्या राजा पुरुषोत्तम गजपती कपिलेंद्रने पूर्व आंध्रचा मोठा हिस्सा बळकावला. याने सलुवा घराण्यातील सरदारांतच असंतोष वाढला. त्याच वेळी इतर इनामदारांनीही विजयनगराविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. नरसिंह देव रायाच्या मृत्यूनंतर, त्याचा मुलगा तिम्म भूपाळ राजा झाला परंतु काही दिवसांतच तो सत्तासंघर्षाला बळी पडला आणि त्याचा भाऊ दुसरा नरसिंह रायला सम्राटपदी बसवले गेले.
दुसऱ्या नरसिंह राय लहान असल्याने त्याच्या सेनापती तुलुवा नरस नायकने त्याच्या नावाने कारभार करणे सुरू केले. नरस नायकाने मैसुरुसह संगम घराण्याच्या समर्थकांना दडपणे सुरू केले. नरस नायकाचा मुलगा वीर नरसिंह सुद्धा यात सहभागी होता. पुढे सिंहासनावरील हक्कावरून वाद होऊन तो वेगळा झाला. नरस नायकाच्या मृत्यूनंतर वीर नरसिंहाच्या साथीदारांनी दुसऱ्या नरसिंह रायाची दिवसाढवळ्या हत्या केली आणि वीरनरसिंहाने सिंहासन बळकावले. वीर नरसिंह तुलुवा घराण्याचा पहिला सम्राट होय.
या सगळ्या उलथापालथी दरम्यान दुसरा चामराज मैसुरुचा राजा होता.
म्हैसूर बंडाची सुरुवात
या गोंधळात चामराजने आपल्या राज्याचा किरकोळ फायदा करून घेतला होता परंतु इतर सरंजामदारांप्रमाणे मैसुरुने तटस्थ राहणे पसंत केले. सलुवा नरसिंह रायाच्या सत्ताकाळात त्यांना हे करणे भागच पडले.
वीर नरसिंहाने विजापूरच्या युसुफ आदिलखानचा पराभव करून त्याला मैसुरुजवळच्या प्रदेशातून लांब ठेवले. परंतु कालांतराने चामराजाने उम्मट्टूरमधील आपल्या सरदाराची साथ घेउन इतर छोट्या सरंजामदारांना हाताशी घेतले आणि थेट वीर नरसिंहाविरुद्ध उठाव केला आणि त्याला पदच्युत करून कृष्णदेवरायाला सम्राटपदी बसवले.या झटापटीत पोर्तुगीजांनी वीर नरसिंहाची मदत केली होती. पोर्तुगीजांनी भारतात थेट लष्करी हस्तक्षेप करण्याची ही पहिलीच वेळ होय.
या सत्ताबदलाच्या परिणामी कृष्णदेवराय सिंहासनावर बसला परंतु आत्तापर्यंत बलाढ्य असलेल्या विजयनगरच्या सम्राटाविरुद्ध त्याच्याच सरंजामदारांत महत्वाकांक्षा निर्माण झाल्या.
कृष्णदेवरायाला सिंहासनावर बसविल्यावर दुसऱ्या चामराजाने मैसुरुमध्येच तळ ठेवला व इतर काही मोठ्या हालचाली केल्या नाहीत.
चामराज ५०व्या वर्षी नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू पावला.