झिने एल अबिदिन बेन अली (अरबी: زين العابدين بن علي; ३ सप्टेंबर १९३६) हा उत्तर आफ्रिकेमधीलट्युनिसिया देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. ट्युनिसियाचा पहिला अध्यक्ष हबीब बुरग्विबाला एका बंडादरम्यान सत्तेवरून हाकलून बेन अली १९८७ साली राष्ट्राध्यक्षपदावर आला.
आपल्या २४ वर्षांच्या कार्यकाळात बेन अलीने मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली. त्याच्या हुकुमशाही सत्तेला कंटाळून डिसेंबर २०१० मध्ये ट्युनिसियन जनतेने देशव्यापी आंदोलन सुरू केले. ह्या आंदोलनामध्ये बेन अलीला माघार घ्यावी लागली व त्याने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो आपल्या कुटुंबासहित १४ जानेवारी २०११ रोजी सौदी अरेबिया देशामध्ये परागंदा झाला. त्याच्या अनुपस्थितीत ट्युनिसियामधील सर्वोच्च न्यायालयाने त्याला अनेक गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.