त्याने आपल्या साहित्यिक कारकिर्दीत डझनभराहून अधिक कादंबऱ्या, अनेक लघुकथा, काही नाटके व अनेक ललितेतर पुस्तके लिहिली. साप्ताहिकांमधून व मासिकांमधून सुरुवातीला मालिकेच्या स्वरूपात प्रकाशित झालेल्या त्याच्या कादंबऱ्या नंतर पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्या. ओघवती भाषा, अनेकपदरी कथानके तसेच विलक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्त्वे ही डिकन्सच्या लेखनशैलीची खासियत होती. आपल्या अनेक प्रसिद्ध कादंबऱ्यांनी डिकन्सला जगभर अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. आपल्या लेखनातून तसेच इतर कामातून डिकन्सने समाजसुधारणेचा जीवनभर पुरस्कार केला.