गुरू अर्जन ( १५ एप्रिल १५६३- ३० मे १६०६) हे शीख संप्रदायातील दहा गुरूंच्या पैकी एक गुरू आहेत. ते शिखांचे पाचवे गुरू मानले जात असून हौतात्म्य स्वीकारलेले गुरू म्हणून त्यांच्याप्रती विशेष आदर दिसून येतो.[१] शीख संप्रदायाचा मूळ ग्रंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरू ग्रंथ साहिब याचे संकलन यांनी केलेले आहे.
बालपण
गुरू अर्जन यांचे वडील गुरू रामदास हे शिखांचे चौथे गुरू असून त्यांच्यी आई बीबी भानी या होत्या. गुरू अमरदास यांच्या देखरेखीखाली यांचे सर्व शिक्षण आणि बालपण व्यतीत झाले.[२]
कार्य
वयाच्या १८ व्या वर्षी गुरुपदी आलेल्या गुरू अर्जन यांनी; आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा प्रत्येक शीख व्यक्तीने सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी दान केला पाहिजे अशी शिकवण शीख धर्मात रुजविलेली आहे. यांचे पुत्र गुरू हरगोविंद हे शिखांचे सहावे गुरू म्हणून प्रसिद्ध झाले.
आपल्या धर्मासाठी गुरू अर्जन यांनी बलिदान दिले आहे. सम्राट अकबर यांच्या मृत्यूनंतर राजा झालेल्या जहांगीर यांच्या मुलाने बंडखोरी केल्याने त्याला अटक करण्याचे आदेश निघाले. त्यावेळी तो पळून आला आणि प्रवासात गुरू अर्जन यांना भेटला. गुरूंनी त्याचे स्वागत केले मात्र नंतर त्याने गुरू अर्जन यांच्यावर आरोप करून त्यांना अटक केली. आपल्या मनाप्रमाणे गुरूंनी वागावे यासाठी त्याने त्यांचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला मात्र यश न मिळाल्याने त्याने गुरूंचा छल करून त्यांना हौतात्म्य स्वीकारायला लावले.[२]
गुरूंचे अर्धवट बेशुद्ध अवस्थेतील शरीर रावी नदीत सोडून देण्यात आले. तिथे किनारी त्यांच्या स्मरणार्थ डेरा साहिब गुरुद्वारा याची निर्मिती करण्यात आली आहे.