गडहिंग्लज तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
तालुक्यातील सामानगड किल्यावरील हिंग्लजा देवीवरून तालुक्याला गडहिंग्लज हे नाव पडले. तालुका कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला कर्नाटक सीमेला लागून आहे. त्यामुळे येथे सांस्कृतिक विविधता आढळून येते. राष्ट्रीय महामार्ग ४ जवळ असलेने वाहतुकीच्या भरपूर सोई आहेत. सदरचा तालुका हा डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जात असला तरी शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्राची पंढरी म्हणून सुद्धा नावाजलेला आहे. या तालुक्या मध्ये सहा वरिष्ठ महाविद्यालये आहेत. या तालुक्याची ग्राम दैवत 'काळभैरी'आहे, ज्याची दरवर्षी फेब्रुवारी मध्ये यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व आंध्रप्रदेश राज्यामधून भाविक येतात. या तालुक्यात हरळी येथे सहकारी साखर कारखाना आहे. गडहिंग्लज नजीक सामानगड, रामतीर्थ,आंबोली घाट ही पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहे.
गडहिंग्लज तालुका हा गुळ व मिरची यासाठी प्रसिद्ध आहे. आठवडी बाजार 'रविवारी' असून त्याकरीता तालुक्यातील जवळपास असणाऱ्या गावातील लोक आठवडी बाजारसाठी येतात. गडहिंग्लज मधून 'हिरण्यकेशी' नदी वाहते. तिचा उगम आंबोली नजीक झाला आहे. या नदीमुळे तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. नदीवरील चित्री प्रकल्पामुळे तालुक्यात बारमाही नदी वाहते. प्रकल्पामधून वीजनिर्मिती सुद्धा केली जाते.