कुमारसेन समर्थ हे एका पुरोगामी विचाराच्या मराठी घरात जन्माला आले. चित्रपट सृष्टिच्या आकर्षणामुळे ते या व्यवसायात आले. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले, नल दमयंती (मराठी) आणि रुपये की कहानी (हिंदी) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट आहेत. 'साईबाबा' हा मराठी चित्रपट कुमारसेनांच्या कारकीर्दितील सर्वात यशस्वी चित्रपट आहे. जर्मनीला जाऊन त्यांनी कला दिग्दर्शनाचे शिक्षण घेतले होते.
कुमारसेनांच्या दुरच्या नातेवाईक असलेल्या रतन बाई यांनी आपली मुलगी शोभनाचे स्थळ लग्नासाठी त्यांना सुचवले. शोभनाला चित्रपटात काम करण्याची फार इच्छा होती आणि तसे त्या प्रयत्नही करत होत्या. शोभनाला हे लग्न करायचे नव्हते पण कुमारसेनांना प्रत्यक्ष बघितल्यावर त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्या लग्नाला तयार झाल्या. शिवाय त्यांनी कुमारसेनांना त्यांच्या चित्रपटात काम करण्याच्या इच्छेविषयी सांगितले आणि लग्नानंतरही चित्रपटात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. कुमारसेनांनी या गोष्टिला काही आक्षेप केला नाही आणि ते शोभनासोबत विवाहबद्ध झाले. लग्नानंतर कुमारसेन आणि शोभना यांनी एकत्र अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्यांना जयदिप, नुतन, चतुरा आणि तनुजा अशी चार अपत्ये झाली. नूतन आणि तनुजा या पुढे अभिनेत्री म्हणून फार प्रसिद्धिस आल्या. लग्नानंतर १४ वर्षांच्या सहजीवनानंतर त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही. कुमारसेनांचा मृत्यू ८० च्या दशकात झाला.