कवार, कंवार किंवा कौर या नावाने ओळखली जाणारी भारतातील ही वन्य जमात मध्य प्रदेश राज्यातील छत्तीसगढ जिल्ह्यात व त्याच्या आसपासच्या प्रदेशात मुख्यत: आढळते. १९६१ च्या जनगणनेनुसार यांची संख्या ३,२७,७१५ होती. आपण कौरवांचे वंशज आहोत असे ते म्हणतात.
उपगट
आठ अंतर्विवाही गटांत ही जमात विभागली आहे. त्यांची तनवार, कमलबन्सी, पैकारा, दूध-कवार, रथिया, चांटी, चेखा आणि राऊटिया अशी नावे आहेत. तनवार कुळीला उमराव असेही नाव आहे. जमीनदार लोक याच कुळीचे असून आपण तोमरा राजपूत आहोत, असे ते सांगतात व जानवे घालतात. ते विधवाविवाह करीत नाहीत, मांस खात नाहीत व मद्य पीत नाहीत. दूध-कवार हे स्वतःला सर्वश्रेष्ठ कवार समजतात. कमलबन्सी म्हणजे कमलनालवंशी कवार होत. आपण कमळापासून झालो असे ते सांगतात. कमळनालापासून ब्रह्मदेव झाला म्हणून आपण जगातले प्राचीन जन आहोत असे ते म्हणतात. वर उल्लेखिलेल्या कुळींची आपापसांत लग्ने होत नाहीत. कवारांत ११७ बहिर्विवाही कुळी आहेत. झाडे किंवा प्राणी ही त्यांची गणचिन्हे आहेत. उदा., आंडिल (अंडे), बाघ (वाघ), बिच्छि (विंचू), बिलवा (मांजर), बोकरा (बोकड), चंद्रमा, चीता (चित्ता), दर्पण (आरसा), हुंदार (लांडगा), सेंदुर, महादेव इत्यादी.
श्रद्धा व परंपरा
कवारांत लग्नाची मागणी मुलाकडून मुलीला येते. ‘तुमच्याकडून अमक्या अमक्याला द्रोणभर पेज हवी आहे’, अशी लग्नाची मागणी होते. मुलीला देज द्यावे लागते. त्याला सुक (शुल्क) म्हणतात. लग्न मुलीच्या घरी होते. पहिल्या दिवशी सहा फेरे वधू-वर घालतात व दुसया दिवशी सातवी फेरी घालतात. हाच मुख्य लग्नविधी असतो. लग्न झाल्यावर मुलगी सासरी जाताना मुलीचे आईबाप वधूवरांचे पाय दुधाने धुतात व मुलीस जन्म दिल्याचे प्रायश्चित्त म्हणून ते दूध पितात. मुलगी सासरी गेली की चौथ्या दिवशी माहेरी येते. आषाढात ती गौर खेळण्यासाठी माहेरी फिरून येते.
कवार परमेश्वरास भगवान म्हणतात. सूर्यास भगवान समजतात, पण त्यास केवळ प्रणाम करण्यापलीकडे काही करीत नाहीत. कवारांचे मुख्य दैवत ‘झागरा खांड’ आहे. झागरा खांड म्हणजे दुधारी तलवार. बाघ किंवा बाघरा देव, मांडवा रानी व सात बहिणी वगैरे देवता ते मानतात.
कवार मुख्यत: शेती किंवा शेतमजुरी करतात. मृताला ते पुरतात. आता त्यांच्यात अग्निसंस्कार करण्याची प्रथा वाढत चालली आहे.
संदर्भ
- Russell, R. V.; Hiralal, Tribes and Castes of the Central Provinces of India, 4 Vols., London, 1916.
- मराठी विश्वकोश
- http://mr.vikaspedia.in/