एस. गोपालकृष्णन (क्रिस) यांचा जन्म इ.स. १९५६ मध्ये त्रिवेंद्रम येथे झाला. त्यांचे आजोबा शिक्षक होते. त्यांचे हलाखीचे आयुष्य पाहून गोपालकृष्णन यांच्या वडिलांनी स्वतःची कारकुनाची नोकरी सोडून देऊन प्लंबरचा व्यवसाय पत्करला, आणि तो ते आयुष्यभर करत राहिले. जरी हा व्यवसाय अत्यंत सामान्य समजला जात असला तरी त्यामुळे गोपालकृष्णन यांव्या मनात आपण उद्योजक व्हावे अशी मनीषा निर्माण झाली. मात्र, त्यांच्या आईवडिलांची इच्छा गोपालकृष्णन यांनी डॉक्टर व्हावे अशी होती. परंतु त्यासाठीच्या प्रवेशपरीक्षेत आवश्यकतेपेक्षा केवळ दोन गुण कमी पडल्यामुळे गोपालकृष्णन यांची ही संधी हुकली. नंतर त्यांनी चेन्नईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्टमध्ये प्रवेश घेतला. तिथून ते १९७७ मध्ये एम.एस्सी. झाले व नंतर त्यांनी १९७९ मध्ये संगणकशास्त्रात पदवी घेतली. एन्आर नारयणमूर्ती आणि गोपालकृष्णन यांच्यासह इतर पाच लोकांच्या गटाने इन्फॉसिस टेक्नॉलॉजी लिमिटेडची स्थापना केली. संस्थेत सुरुवातीला गोपालकृष्णन यांच्याकडे तंत्रज्ञानाचे आराखडे बनवणे, त्यांत सुधारणा करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे काम होते. त्याचबरोबर ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण करणाऱ्या कारखानदारांना आपण संशोधन करून निर्माण केलेल्या नवीन तंत्रांचा परिचय करून देणे हेही काम होते.
१९८७ ते १९९४ या काळात गोपालकृष्णन अमेरिकेतल्या अटलांटा येथे इन्फॉसिस आणि केएस्एस् या दोघांच्या भागीदारीत चालणाया संस्थेचे व्हाइस प्रेसिडेन्ट होते. १९९४ मध्ये ते परत भारतात आले आणि इन्फोसिसचे उपमहाव्यवस्थापक झाले.२००७ मध्ये श्री. नारायणमूर्ती सेवानिवृत्त झाल्यावर, गोपालकृष्णन त्यांच्या जागेवर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरव्यवस्थापक झाले.
फोर्ब्जने २०१० साली तयार केलेल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत गोपालकृष्णन यांचा क्रमांक भारतात ४३ वा आणि जगात ७७३ वा होता. त्यांचा समावेश जगातल्या पहिल्या ५० कार्यक्षम अधिकाऱ्यांमध्ये झाला आहे. २१ ऑगस्ट २०११ रोजी गोपालकृष्णन इन्फॉसिसच्या सक्रिय पदावरून निवृत्त झाले. हल्ली(२५-९-२०११) ते इन्फॉसिसच्या संचालकमंडळाचे कार्यकारी सह-अध्यक्ष आहेत. याशिवाय ते जगभरातल्या आणि देशातल्या अनेक संस्थांमध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावत असतात. अनेक जागतिक व्यावसायिक संस्थांमध्ये ते सल्लागर समित्यांचे सदस्य आहेत.
एस. गोपालकृष्णन (क्रिस) यांना जानेवारी २०११ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण या नागरी सन्मानाने पुस्कृत केले.