सुरुवातीला, एर इंडिया वन हे एर इंडियाचे बोईंग ७४७-४०० होते जे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या हवाई प्रवासासाठी वापरले जात असे. भारताने २०२० मध्ये जुन्या बोईंग ७४७ च्या जागी बोईंग ७७७ ही नवीन विमाने विकत घेतली आहेत. या विमानाची जबाबदारी जरी एर इंडियाकडे असली तरी विमानासाठी वैमानिक हे भारतीय वायुसेनेमधील आहेत. एर इंडिया वन विमानात, राष्ट्रपतींना VIP-1, उपराष्ट्रपतींना VIP-2 आणि पंतप्रधानांना VIP-3 असा दर्जा दिला जातो. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या युनायटेड स्टेट्स एर फोर्स वन सारखेच बोईंग-७७७ हे क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि इतर सुरक्षा उपायांनी सुसज्ज आहे. लार्ज एरक्राफ्ट इन्फ्रारेड काउंटरमेझर्स (LAIRCM) आणि सेल्फ-प्रोटेक्शन सूट (SPS) सारख्या यंत्रणांनी विमान सुरक्षित आहे. शत्रूच्या रडार सिस्टमला जाम करण्यासाठी या विमानात जॅमरचीही सुविधा आहे. वेळप्रसंगी बोईंग ७७७ मध्ये हवेतच इंधन भरता येते आणि GE90-115 डबल इंजिन असणारे हे विमान कमाल ५५९.३३ मैल प्रती तास एवढ्या वेगाने उडू शकते. एर इंडिया वन च्या एका बाजूला हिंदी मध्ये भारत आणि इंग्रजीमध्ये India आणि यांच्या मध्ये अशोक चक्र आहे. एर इंडिया वनच्या शेपटीवर भारताचा राष्ट्रध्वज आहे. एर इंडिया वन विमानात एक मोठं ऑफिस आणि कॉन्फरन्स रूमसोबतच लॅबची सुविधाही आहे. लांबच्या प्रवासाचा विचार करून या सुविधा विमानात देण्यात आल्या आहेत.[१]
B737 BBJ आणि ERJ-135 सारखी अतिरिक्त भारतीय वायुसेनेची व्हीआयपी विमाने देखील अनेक सरकारी मान्यवर (पंतप्रधानांसह) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मध्यम प्रवासासाठी वापरतात.[२]