ए.आर. जोशी (जन्म : ठाणे, २० डिसेंबर, १९५३) हे मुंबई उच्च न्यायालयात एक न्यायाधीश होते. दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवून मानवहत्या केल्याच्या सर्व आरोपांतून जोशींनी सलमान खानला मुक्त केले. निवृत्तीपूर्वी जोशींनी दिलेला हा अखेरचा निकाल होता.
हे निकालपत्र समोर एकही लिखित मुद्दा न ठेवता न्यायमूर्ती जोशी सलग पाच तास आणि सलग तीन दिवस भर न्यायालयात त्यांच्या दोन स्टेनोजना आलटून पालटून देत होते. त्यावेळी त्यांच्याजवळ रेफरन्सला याच प्रकारच्या खटल्यांबाबत सुप्रीम आणि हायकोर्टांनी दिलेले निर्णय (नंबर्स, तारखा) मात्र होते. निकाल देण्यापूर्वीच्या काही दिवसांत जोशींनी या खटल्याशी निगडित सुमारे १२ ते १५ हजार पाने अक्षरशः अहोरात्र बैठक मारून वाचली होती.
सलमानचा या खटल्याच्या काळातच न्यायमूर्ती जोशी हे त्यांच्या न्यायालयाच्या कक्षेत येणारे इतर खटले, आयत्या वेळी स्थापन होणारे डिव्हिजन बेंच आणि तिथले खटले ऐकत होते व. निर्णय देत होते. हे करत असतानाच रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यांचे पालक न्यायमूर्ती (guardian judge) म्हणून तिथल्या न्यायाधीशांच्या अडचणीही सोडवत त्यांना, मार्गदर्शन करीत होते; त्यांच्या कार्यशाळा घेण्यासाठी तिथे जात होते.
ए.आर. जोशी यांनी ठाणे लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. इ.स. १९९३मध्ये ते मुंबईत दिवाणी व सेशन्स कोर्टात न्यायाधीश झाले. २००५मध्ये त्यांनी हायकोर्टात रजिस्ट्रार म्हणून काम केले.
त्यानंतर पुन्हा मुंबई व रत्नागिरी दिवाणी-सेशन्स कोर्टात न्यायदान केल्यानंतर १० फेब्रुवारी २००९पासून जोशींवर मुंबई हायकोर्टात न्यायमूर्तीची जबाबदारी सोपवण्यात आली.
न्यायाधीशाच्या कारकिर्दीच्या २३ वर्षात न्यायमूर्ती ए.आर. जोशींनी आईचा मृत्यू, सासू-सासऱ्यांचा मृत्यू आणि स्वतःच्या मुलीचा विवाह दोडला तर.एकाही व्यक्तिगत समारंभास हजेरी लावली नव्हती. रोज रात्री दहानंतर एक ते दीड वाजेपर्यंत वाचन करणे, पहाटे पाच-साडेपाचला उठून पुन्हा वाचन, थोडा व्यायाम, पूजा, जेवण करून कोर्टात जाणे व रात्री आठपर्यंत घरी परतणे हीच त्यांची दिनचर्या होती.
ए.आर. जोशी हे त्यांच्या २३वर्षाच्या नोकरीतली १५हून अधिक वर्षे NDPS (अमली पदार्थ विरोधी) आणि Anti Corruption (भ्रष्टाचारविरोधी) यांसाठी विशेष न्यायाधीश म्हणून काम करत होते.
आपल्या निवृत्तीपूर्वी निर्णय द्यावा, या उद्देशानेच न्यायमूर्तींनी सलमान प्रकरणाची सुनावणी आग्रहपूर्वक पूर्ण केली. त्या दृष्टीने त्यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाला युक्तिवाद करण्यास सांगितले होते.
१९ डिसेंबर २०१५ रोजी ए.आर. जोशी सेवानिवृत्त होतील. त्यानंतर ते आणि त्यांच्या पत्नी अनघा जोशी सुखाने सहजीवनाचा आस्वाद गेऊ शकतील.