इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (इंग्रजी: Inter-University Center for Astronomy and Astrophysics (IUCAA)) ही पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेली एक संशोधन संस्था आहे. ती आयुका या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध आहे. या संस्थेमध्ये प्रामुख्याने खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि सैद्धांतिक भौतिकी या विषयांवर संशोधन केले जाते. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकर हे या संस्थेचे पहिले संचालक होते. आयुकाच्या कॅम्पसची रचना प्रसिद्ध भारतीय वास्तुशास्त्रज्ञ चार्ल्स कोर्रिआ यांनी केली.[२]
इतिहास
प्रा. गोविंद स्वरूप यांनी नारायणगावजवळील खोडद येथे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप बसवल्यानंतर नियोजन आयोगाच्या प्रा. यश पाल यांनी देशामध्ये खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीसाठी संयुक्त सुविधा असली पाहिजे असा प्रस्ताव मांडला. यावर काम करून खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी अजित केंभावी आणि नरेश दधिच यांच्यासोबत १९८८ मध्ये आयुकाची स्थापना केली.[२]
२००४ साली आयुकाने पु.ल. देशपांडे संस्थेच्या अनुदानाने "मुक्तांगण विज्ञान शोधिका" या विज्ञान केंद्राची सुरुवात केली. हे केंद्र पुण्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खुले आहे.[४] २००९ साली आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्षाच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रमांचे संयोजन करण्यासाठी आयुकाची निवड करण्यात आली.[५]
पर्सिस्टंट सिस्टम्स पुणे यांच्या सहकार्याने आयुका आभासी वेधशाळा प्रकल्प चालवते. हा प्रकल्प वापरकर्त्यांना रॉ डेटा आणि पर्सिस्टंट सिस्टम्सच्या अभियंत्यांनी बनवलेले त्यावर प्रकिया करणारे आधुनिक सॉफ्टवेर पुरवतो.[७]
त्याचबरोबर आयुका गिरवली वेधशाळा चालवते. गिरवली वेधशाळा पुण्यापासून जवळपास ८० किमी अंतरावर ऐतिहासिक जुन्नर जवळ एका डोंगरावर आहे. सर्वसाधारणपणे खगोलशास्त्रज्ञांच्या गरजा भागावण्याशिवाय ही वेधशाळा काही वेळ प्रशिक्षणासाठी आणि भारतीय विद्यापीठांमधून येणाऱ्या निरीक्षण प्रस्तावांसाठी राखून ठेवते. येथील दुर्बिणीचा प्राथमिक आरसा २ मीटर व्यासाचा असून दुय्यम आसरा ६० सेंटीमीटर व्यासाचा आहे. सध्या दुर्बिणीमध्ये आयुका फेंट ऑब्जेक्ट स्पेक्ट्रोग्राफ आणि कॅमेरा (आयएफओएससी) हे मुख्य उपकरण आहे.[८]