ही भारताच्या केरळ, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांमधील अत्यंत गौण समजली जाणारी वन्य जमात आहे. अरनादन स्वतःस एरनाड तालुक्यातील मूळ रहिवासी समजतात म्हणून त्यांना एरनादन असेही म्हणतात. त्यांची संख्या १९४१ साली ४८९ होती. हे मुळचे कंदमुळे वगैरे खाणारे व शिकारी लोक होते, परंतु आता ते शेतमजुरी करू लागले आहेत.
कुरळे केस, रुंद व बसके नाक, त्या भागातील इतर जमातींच्या लोकांच्या मानाने लांब हात, ही त्यांची शरीरवैशिष्ट्ये निग्रोवंशीयांशी मिळतीजुळती आहेत. त्यांची बोली तमिळ, मलयाळम् व तुळू या भाषांच्या मिश्रणातून बनलेली आहे.
अरनादन बांबूच्या झोपडीत राहतात. बांबूच्या चटया तसेच गाडगी, मडकी व पारधीची आयुधे आणि कंद खणण्यासाठी काठ्या, हाच त्यांचा संसार होय. कुटुंबपद्धती पितृसत्ताक आहे. त्यांना संघटित धर्म असा माहीतच नाही.
लग्ने वधूवर वयात आल्यावर वधूमूल्य देऊन होतात. वधूमूल्य सहा रुपये असते व ते दरवर्षी द्यावे लागते. विवाहेतर संबंधही आढळतात. बायकांची अदलाबदलही आढळते. कनिष्ठ देवर-विवाह व मेहुणी-विवाह या जमातीत संमत आहेत. त्यांच्यात काही प्रमाणात बहुपतिपत्नीकत्वही आढळते.
संदर्भ
- Luiz, A. A. D. Tribes of Kerala, New Delhi, 1962.