विकिपीडिया:मराठीतील सदोष अक्षरलेखन

इतर भाषांच्या लिपीत कदाचित योग्य समजले जाणारे, परंतु मराठीत अनुचित समजले जाणारे अक्षरलेखन, शब्दलेखन, वाक्यरचना वगैरे. ..

  • ध्द चूक: द्ध बरोबर. कारण,

मराठीत ध्ध किंवा ध्द ही अक्षरे नाहीत. संस्कृतमध्येही नाहीत. पाणिनीच्या अष्टाध्यायीत ’झलाम्‌ जश्‌ झशि (पाणिनी ८.४.५३) असे एक सूत्र आहे. त्यातले झल्‌ म्हणजे लिपीतील स्वर, यवरलह आणि ङञणनम ही अक्षरे सोडून अन्य मुळाक्षरे. जश्‌ म्हणजे जबगडद ही अक्षरे. ’झशि’ ही झश्‌ या शब्दाची सप्तमी आहे. अर्थ : झभघढध आणि जबगडद ही अक्षरे आली असताना. सूत्राच्या उपयोगाची उदाहरणे : ध्‌+द=द्‍+ध=द्ध. भ्‌+द=ब्‌+ध=ब्ध वगैरे. त्यामुळे शुध्‌+द=शुद्‌+ध=शुद्ध. लभ्‌+द=लब्‌+ध=लब्ध. लभ्‌+तुम्‌=लब्धुम्‌. असेच शब्द क्रुद्ध, स्तब्ध, वगैरे. म्हणून ध्द हे अयोग्य आणि द्ध हे बरोबर .

यासाठी पाणिनीचे सूत्र माहीत नसले तर हरकत नसते. ध म्हणजे ’द’चा हकारयुक्त उच्चार. ध+द=द+(ह+द). आता ह+द हा उच्चार करणे अशक्यप्राय आहे. म्हणूनच ध+द असल्या उच्चाराचे ध्द हे अक्षर संभवत नाही. म्हणून द्ध हेच योग्य.

  • पारंपारिक चूक; पारंपरिक बरोबर. मूळ शब्द परंपरा. त्याला इक प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दातले पहिले अक्षर ’प’, त्याची वृद्धी होऊन ’पा’अक्षर बनते. त्यामुळे परंपरा+इक=पारंपरिक. मूळ शब्दात आलेल्या दुसऱ्या ’प’ची वृद्धी होणाचे कारण नाही. अर्थात्‌ ’पारंपारिक’ अयोग्य आणि ’पारंपरिक’ योग्य.
    परंपरा+इक=परंपर्‌+इक=पारंपरिक. या संधीच्या प्रकाराला पररूप संधी असे म्हणतात. यात पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर जाऊन, त्याजागी दुसऱ्या (पर) शब्दाचा स्वर येतो. (असाच एक पूर्वरूप संधीचा प्रकार असतो. त्याचे उदाहरण : खिडकी+आत=खिडकी+त=खिडकीत.)
  • तात्कालिक बरोबर; तत्कालिक चूक. तत्‌+काल=तत्काल. तत्काल+इक=तात्काल्‌+इक=तात्कालिक. मात्र, तत्काल आणि तत्काळ हेही शब्द बरोबर आहेत, तात्‍काल, तत्कालिक आणि तात्काळ लिहिणे अनुचित.
  • रीत हा मराठी शब्द आहे आणि रीति हा संस्कृत. मराठीच्या निययांप्रमाणे, रीत शब्दाला ’ने’ हा प्रत्यय लागला की रितीने असे रूप होते. (तुला० गरीब+ने=गरिबाने, वकील+चा=वकिलाचा.) शब्दातले उपान्त्यपूर्व अक्षर असल्याने रीत+ने करताना ’री’ ऱ्हस्व होऊन रितीने असे रूप बनते. उपान्त्यपूर्व म्हणजे शब्दातले शेवटून तिसरे किंवा त्या आधीचे कोणतेही अक्षर. वेगळ्या शब्दांत, शब्दातील शेवटून दुसऱ्या अक्षराच्या आधीचे कुठलेही अक्षर.

त्याच वेळी मराठीत ’रीति’ हा संस्कृत शब्द देखील वापरात आहे असा विचार केला, तर... रीति+ने=रीतीने. ’रीति’हा शब्द संस्कृत शब्द असल्याने त्याला ’उपान्त्यपूर्व’चा नियम लागू नाही. थोडक्यात काय तर, रितीने आणि रीतीने हे दोनही शब्द योग्य आहेत. रीतचे अनेकवचन रिती, आणि ’रीति’चे रीती. त्यामुळे दोन्ही बरोबर.
रीतरिवाजही योग्य आणि रीतिरिवाजही बरोबर.
मात्र...रीति या संस्कृत शब्दाची तृतीया विभक्ती ’रीत्या’ अशी होते. ते रूप वापरायचे झाले ’सहजरीत्या’ असाच प्रयोग करावा लागेल.’रित्या’चालणार नाही.

  • प्रतिष्ठान योग्य, प्रतिष्ठाण अयोग्य. याबद्दलचे पाणिनीचे नियम असे : ’रषाभ्यां नो णः समानपदे’ -पाणिनी ८.४.१. अर्थ असा की, एकाच शब्दात(समानपदे) ऋ, र किंवा ष यांच्या पुढे आलेल्या शब्दांतल्या’न’चा ’ण’ करावा. केव्हा? त्यासाठीचा नियम - अट्‌‍कुप्वाङ्नुम्‌व्यवायेऽपि (पाणिनी ८.४.२). ऋ, र, ष आणि ’न’ यांच्यामध्ये अट्‌ (स्वर, अनुस्वार, विसर्ग, आणि हयवर ही अक्षरे) वा, कुपु (क आणि प वर्गांतली व्यंजने) आली तरी ’न’चा ’ण’ करावा. प्रतिष्ठान मध्ये ’ष’ आणि’न’ यांच्यामध्ये ’ठ’ आला आहे. ’ठ’ हा ’क’ किंवा ’प’ वर्गातला नाही. त्यामुळे ’न’चा ’ण’होणार नाही.

मराठी लोकांना पाणिनीचे नियम माहीत नसतात. तरीही ज्या शब्दांत ऋ, र, ष असतात त्यांत न असू शकत नाही याची उपजतच जाण असते. कारण, ऋ, र, ष आणि ण ही चारही मुळाक्षरे मूर्धन्य आहेत. त्यांत ’न’ला स्थान नाही.

  • एकाक्षरी धातू खा, गा, घे, जा, दे, धू, पी, ये वगैरे धातूंचे पूर्वकालवाचक अव्यय करताना, त्यांना ’ऊन’ हा प्रत्यय लावावा लागतो. तो प्रत्यय लावल्यावर रूपे खाऊन, गाऊन. घेऊन, जाऊन, देऊन, धुऊन, पिऊन, येऊन अशी होतात. ’खावून’ अशी ’वू’ असलेली रूपे करणे निषिद्ध आहे. मूळ धातूत ’व’ हे अक्षर नाही. त्यामुळे पूर्वकालवाचक अव्ययातही ते येणार नाही.

असे असले तरी या धातूंच्या विध्यर्थी प्रयोगांत ’व’ येतो. उदा० जावे, यावी, प्यावे. शिवाय जावयास-यावयास, येववणे वगैरे शब्दांत मूळ धातूत नसलेला ’व’ येतो.

काव, खव, गोव, चाव, चेव, जेव, ठेव, दाव, धाव, पाव, भाव, माव, रोव, सोकाव, सोडव या धातूंत ’व’ आहे. त्यामुळे या धातूंची पूर्वकालवाचक रूपे कावून, खवून, गोवून, चावून, चेवून, जेवून. ठेवून, दावून, धावून, पावून, भावून. मावून, रोवून, सोकावून, सोडवून अशीच होतील, चाऊन, जेऊन अशी होणार नाहीत.

  • स्र आणि स्त्र : चतुरस्र, सहस्र, स्राव, स्रोत; परंतु अस्त्र, शास्त्र वगैरे.
  • श्याम बरोबर शाम चूक. मात्र शामळू हा शब्द बरोबर आहे. श्यामवरून श्यामा, श्यामला, श्यामकल्याण, श्यामसुंदर वगैरे शब्द बनतात.
  • घनश्याम बरोबर, घन:श्याम अनुचित. घन(गाढ/दाट/गडद)+श्याम(काळा). ’घन’च्यापुढे विसर्ग येण्याचे कारण नाही.
  • मनःशांती, मन:स्थिती बरोबर; मनशांती वगैरे चूक. मूळ शब्द - मनस्‌. मनस्‌+शांती=मन:शांती. मनस्‌+कामना=मन:कामना(मनोकामना नाही!), मनस्‌+पूत=मनःपूत, अंतर्‌+करण=अंत:करण; असेच शब्द अंतःपुर, अंतःप्रकृती (आतल्या गाठीचा), अंतःस्थ, अंतःस्राव, अंतःस्फुरण, अंतःस्फूर्ती, बहिःस्थ, वगैरे. परंतु अंतकाल, अंतकाळ या शब्दांत विसर्ग नाही.
  • निःस्वार्थ, निःस्पृह बरोबर, निस्वार्थ वगैरे अयोग्य. निस्‌+स्वार्थ=नि:स्वार्थ
  • त्रिंबक चूक, त्र्यंबक बरोबर. त्रि+अंबक=त्र्यंबक (तीन डोळे असलेला-शंकर). यावरून त्र्यंबकेश्वर वगैरे. परंतु त्रिनेत्र हा शब्द योग्य आहे.
  • सहाय्य अयोग्य, साह्य किंवा साहाय्य बरोबर. असे असले तरी हल्ली सहाय्य, सहायक, सहाय्यक असले शब्द रूढ झाले आहेत.
  • कोट्याधीश चूक, कोट्यधीश योग्य. कोटि+अधीश= कोट्यधीश. त्यामुळे कोट्याधीश हे रूप होणार नाही. मात्र लक्षाधीश(लक्ष+अधीश) बरोबर.
  • षष्टि+अब्दी=षष्ट्यब्दी, षष्ट्याब्दी नव्हे.
  • धिःकार चूक, धिक्कार योग्य. धिक्‌+कार=धिक्कार. असेच शब्द - पृथक्‌+करण=पृथक्करण
  • यावरून सापाचा फूत्कार, पारव्याचा किंवा घुबडाचा घूत्कार, हत्तीचा चीत्कार वगैरे. या तीनही शब्दांतल्या पहिल्या अक्षराचे इकार-उकार दीर्घ आहेत. मराठीत धुत्कार हा टर, हेटाळणी अशा अर्थाचा शब्द आहे, त्यातील ’धु’ ऱ्हस्व आहे.
  • हाहा:कार चूक, हाहाकार योग्य. ’हाहा’नंतर विसर्ग येण्याचे काहीच कारण नाही.
  • परंतु भुभु:कार=माकडाचे ओरडणे. ’भुभु:कार’मध्ये विसर्ग आहे.
  • त्व आणि त्त्व : त्व हा प्रत्यय ज्या शब्दाला लागतो आहे त्या शब्दाच्या अंती जर मुळातच ’त्‌ असेल तर जोडशब्दात त्‍त्व येतो, अन्यथा त्व. उदा० सत्‌=त्व=सत्त्व; तत्‌=त्व=तत्त्व; महत्‌+त्व=महत्त्व वगैरे. परंतु वक्तृ+त्व=वक्तृत्व(त्त्व नाही), असे आणखी शब्द - कर्तृत्व, दातृत्व, दासत्व(दास्यत्व नाही!), पितृत्व, मनुष्यत्व, मातृत्व, मित्रत्व, शत्रुत्व, हिंदुत्व, वगैरे.

पहा : रु आणि रू; त्व आणि त्त्व

(अपूर्ण)

हे सुद्धा पाहा

__DTELLIPSISBUTTON__{"threadItem":{"headingLevel":2,"name":"h-","type":"heading","level":0,"id":"h-\u0939\u0947_\u0938\u0941\u0926\u094d\u0927\u093e_\u092a\u093e\u0939\u093e","replies":[]}}-->

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!