रूपा कुळकर्णी-बोधी

रूपा कुळकर्णी-बोधी
जन्म रूपा कुळकर्णी
२७ एप्रिल, १९४५ (1945-04-27) (वय: ७९)
जबलपूर जिल्हा, मध्य प्रदेश
निवासस्थान नागपूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे रूपा बोधी
शिक्षण एम.ए., पीएच.डी.
प्रशिक्षणसंस्था नागपूर विद्यापीठ
पेशा सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, व विचारवंत
प्रसिद्ध कामे महिला कामगारांच्या हक्कांविषयी लढा
वडील कृष्णराव
आई प्रमिला

रूपा कुळकर्णी-बोधी (२७ एप्रिल, १९४५ - ) या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका व निवृत्त प्राध्यापिका आहेत. त्या घरकाम कामगारांच्या हक्कांसाठी लढतात. त्यांचा अनेक सामाजिक कामांत व आंदोलनांत त्यांचा सहभाग राहिला आहे.[]

कारकीर्द

मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात २७ एप्रिल १९४५ रोजी रूपा कुळकर्णी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कृष्णराव हे शिक्षक होते तर आई प्रमिला या आरोग्य विभागात काम करत होत्या. सहाव्या वर्षी कुटुंबासह रूपा या नागपुरात वास्तव्यास आल्या. संस्कृत भाषेत एम.ए. आणि पीएच.डी. या पदव्या प्राप्त केल्यानंतर त्यांनी तत्कालीन नागपूर विद्यापीठात संस्कृतच्या प्राध्यापिका झाल्या. २००५ मध्ये त्या (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज) नागपूर विद्यापीठातून संस्कृत विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या.[]

धर्मांतर

कुळकर्णी यांचा बौद्ध धम्मआंबेडकरी विचारांकडे कल होता. यातूनच त्यांनी १९९२ मध्ये वयाच्या ४७ वर्षी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला.[][] धर्मांतरानंतर त्यांनी बौद्ध संकल्पनेशी संबंधित 'बोधी' हे आडनाव स्वीकारले. त्यांनी सांगितले की, "मी घरेलू कामगारांबरोबर काम करायला सुरुवात केली होती. ते अशा जातींतून येतात, की ज्यांना खालची जात मानली जाते. त्यांची परिस्थिती अंत्यत बिकट असते. त्यामुळे मला माझी जात एक ओझं, एक कलंक वाटायला लागली होती म्हणून ती सोडणंच मला योग्य वाटलं." त्यांच्या मते वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि फिल्म इंडस्ट्रीच नाही तर टीव्हीवर येणाऱ्या मालिकांमध्येही जातीच्या आधारावर वेगळे राहण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले जाते.[] रूपा कुळकर्णी या बुद्धिवादी विचारवंत म्हणून ओळखल्या जातात. बीड येथे झालेल्या १२व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.[]

रिडल्स आंदोलनात सहभाग

रूपा कुळकर्णी यांचा रिडल्स आंदोलनात समर्थनीय सहभाग होता. १९८८ मध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'रिडल्स इन हिंदुइझम' पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी झाली. त्यातही ‘रामायण’ आणि 'महाभारत’ या दोन आर्षमहाकाव्यांचा संबंध होता. त्यामुळे ‘हिंदूधर्मातील ती कोडी’ म्हणजे संवेदनशील विषय बनला होता. त्यावेळी रूपा कुळकर्णी यांनी पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांचा वैचारिक परामर्ष घेतला होता.[] १९८८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'रिडल्स इन हिंदुइझम' या खंडावरील बंदीच्या विरोधातील आंदोलनात समर्थनाची स्पष्ट भूमिका रूपा कुळकर्णी यांनी घेतली होती, त्यावेळी असे करण्याऱ्या त्या संस्कृत विषयाच्या एकमेव ब्राम्हण प्राध्यापिका होत्या. त्यांच्या लेखावर बरेच वादंग माजले. प्रामुख्याने संस्कृतचे ज्येष्ठ प्राध्यापक मा.गो. वैद्य यांच्याशी त्यांचा जाहीर वाद-प्रतिवाद होत होता. लोक त्या वृत्तपत्राच्या झेरॉक्स प्रती काढून एकमेकांना वाचायला देत असत. मुंबईत त्या वेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने झालेल्या रिडल्स समर्थन परिषदेतही त्यांना निमंत्रित करण्यात आले. त्या सभेत दादासाहेब गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, राजा ढाले, नामदेव ढसाळ अशी अनेक रिपब्लिकन पुढारी आलेले होते. अखेर सरकारने पुस्तक प्रकाशित केले.[]

कामगारांसाठी कार्य

असंघटित कामगारांमध्ये घरकाम करणाऱ्या मोलकरणी हा खूप मोठा वर्ग आहे. त्यांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती नव्हती. इ.स. १९८०मध्ये रूपा कुळकर्णी यांनी या मोलकरणींना संघटित करून त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी लढा सुरू केला. २८ वर्षांच्या लढ्यानंतर घरकाम कामगारांसाठी २००८ मध्ये महाराष्ट्रात 'घरेलू कामगार कायदा' लागू झाला. असा कायदा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका बोर्डाची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून राज्यात १ लाख ४८ हजार घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करण्यात आली. २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारने मोलकरणींसाठी अस्तित्वात असलेला बोर्ड बरखास्त केला. हा बोर्ड पुन्हा अस्तित्वात यावा, याकरता कुळकर्णी यांचा संघर्ष सुरू आहे.[] सध्या त्यांनी अडीच कोटी कामगारांना संघटित केले असून, त्यांना ४५ कोटी असंघटितांना एका छताखाली आणायचे आहे.[] 

पुस्तके

रूपा कुळकर्णी यांची विविध विषयांवरील १०पेक्षा अधिक पुस्तके प्रकशित झाली आहेत.[] त्यांतली काही ही :

  • आचार्य अश्वघोषकृत वज्रसूची[]
  • विपरीत आरक्षण[]

पुरस्कार

  • मिलिंद आर्ट कॉलेजतर्फे "मिलिंद समता पुरस्कार" रूपा कुळकर्णी-बोधी यांना १७ जानेवारी २०१६ रोजी प्रदान केला गेला.[]
  • २०१५ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राच्या वतीने त्यांना "यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार" ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.[१०]

संदर्भ

  1. ^ a b आर्य, दिव्या (3 एप्रि, 2018). "#BBCShe जाती-धर्माच्या बेड्या तोडण्यासाठी धडपडणाऱ्या त्या" – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b c "ETV Bharat". www.etvbharat.com. 2020-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-28 रोजी पाहिले.
  3. ^ "India's Hindu nationalist group pins high hopes on Modi victory". The National (इंग्रजी भाषेत). 2020-02-28 रोजी पाहिले.
  4. ^ आर्य, दिव्या (2018-04-03). "#BBCShe जाती-धर्माच्या बेड्या तोडण्यासाठी धडपडणाऱ्या त्या". BBC News मराठी. 2020-02-28 रोजी पाहिले.
  5. ^ a b "डॉ. रुपा कुलकर्णींना मिलिंद समता पुरस्कार". Maharashtra Times. 12 जाने, 2016. 2020-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-28 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ Gaikwad, Priyanka. "रिडल्स मोर्चा : ३० वर्षापूर्वी |". 2020-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-28 रोजी पाहिले.
  7. ^ "चळवळीने दिलेलं सर्वांत मोठं भान". Maharashtra Times. 27 एप्रि, 2014. 2020-02-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-29 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ "'हिंदुत्वाचा मोह सोडा; बुद्ध स्वीकारा'". Maharashtra Times. 27 नोव्हें, 2015. 2020-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-28 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ a b "BookGanga - Creation | Publication | Distribution". www.bookganga.com.
  10. ^ "'हिंदुत्वाचा मोह सोडा; बुद्ध स्वीकारा'". 2020-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-28 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!