रवींद्र महाजनी |
---|
जन्म |
रवींद्र महाजनी १९४९ बेळगाव |
---|
मृत्यू |
१४ जुलै २०२३[१] आंबे, मावळ तालुका |
---|
राष्ट्रीयत्व |
भारतीय |
---|
कार्यक्षेत्र |
अभिनय |
---|
भाषा |
मराठी |
---|
प्रमुख चित्रपट |
देवता |
---|
वडील |
ह.रा. महाजनी |
---|
अपत्ये |
गश्मीर महाजनी व एक मुलगी |
---|
रवींद्र महाजनी (१९४९ - १४ जुलै, २०२३) हे मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता होते. त्यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या इ.स. १९७५ सालच्या मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले[२]. त्याने भूमिका साकारलेले लक्ष्मी (इ.स. १९७८), दुनिया करी सलाम (इ.स. १९७९), गोंधळात गोंधळ (इ.स. १९८१), मुंबईचा फौजदार (इ.स. १९८५) हे चित्रपट विशेष गाजले.
महाजनीने चित्रपट दिग्दर्शक व निर्माता म्हणूनही काम केले आहे. त्याने इ.स. १९९७ सालच्या सत्तेसाठी काहीही या चित्रपटाची दिग्दर्शन व निर्मिती केली[२].
वैयक्तिक आयुष्य
महाजनी यांचा जन्म बेळगाव (कर्नाटक) मध्ये १९४९ साली एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील हणमंत उर्फ ह.रा. महाजनी हे मराठी पत्रकार होते. महाजनी दोन वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले. ह.रा. महाजनी हे लवकरच ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. महाजनी यांना बालपणापासून अभिनयाची आवड होती. मोठेपणी नाटक-चित्रपटात काम करायचे, हे त्यांनी आधीच ठरवून टाकले होते. त्यांनी खालसा महाविद्यालय येथून बी.ए. चा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांच्या सोबत महाविद्यालयात तेव्हा रॉबिन भट्ट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर ही मंडळी शिकत होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर चित्रपटात जाण्याचे या सर्वांचे धेय होते. त्या वेळी ही मंडळी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विविध नाटके आणि कार्यक्रम करायचे.[३]
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत आपले प्रयत्न सुरू केले. त्यांचे वडील वारले आणि घरची आर्थिक जबाबदारीही त्यांच्यावर पडल्याने काही काळ त्यांनी छोटी-मोठी कामे केली, अगदी टॅक्सी देखील चालवली. ‘लोकसत्ता’च्या संपादकांचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून आप्तस्वकीय आणि नातेवाइकांकडून टीका देखील झाली.[३]
मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना योग्य अशी पहिली संधी मिळाली आणि त्यांनी त्यात साकारलेली मुख्य भूमिका गाजली. नंतर कालेलकर यांनी खास त्यांच्यासाठी ‘तो राजहंस एक’ हे नाटक लिहून काढले. व्ही. शांताराम यांनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटातील मुख्य भूमिका दिली. १९७४ मधील हा चित्रपट तेव्हा चांगला गाजला. या चित्रपटाने त्यांचा नऊ वर्षांचा संघर्ष संपवला. ‘झुंज’ चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश मिळवले आणि महाजनीं मराठी चित्रपट सृष्टीतील मोठे कलाकार झाले. त्यानंतर ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ या व इतर चित्रपटात महाजनींनी काम केले. त्या काळात तमाशापटांची आणि ग्रामीण पार्श्वभूमीच्या चित्रपटांची चलती असताना खास महाजनींसाठी शहरी रूपाला शोभून दिसतील, अशा कथा लिहिल्या गेल्या. १९७५ ते १९९० या काळात महाजनी मराठी चित्रपटातील मोठे कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. महाजनींनी ‘बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या मराठी नाटकांचे अनेक प्रयोग देखील केले.[३]
इ.स. १९९० नंतर महाजनी चरित्र भूमिकांकडे वळले. काही दूरचित्रवाणी मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले होते. ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाची निर्मिती आणि आणि दिग्दर्शन देखील त्यांनी केले. २०१५ नंतर त्यांनी 'काय राव तुम्ही', 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळ बंद', 'पानीपत' या मराठी चित्रपटांतून काही भूमिका केल्या होत्या.[३]
मृत्यू
त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि मुलगी एवढा संसार असताना देखील महाजनी तळेगाव दाभाडे येथील सदनिकेत एकटे रहात होते. शुक्रवार १४ जुलै २०२३, रोजी त्यांचे राहत्या घरी कलेवर सापडले. दोन तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांनी कयास लावला.[४].रवींद्र महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर एकटेच रहात होते.
संदर्भ
बाह्य दुवे