योनी हे तंतुस्नायुमय नलिकाकृती जननेंद्रिय असून त्याची दोन मुख्य कार्ये आहेत : लैंगिक समागम आणि अपत्यजन्म. मानवी शरीरामध्ये हा मार्ग योनिकमलापासून गर्भाशयापर्यंत जात असला तरी योनीमार्ग गर्भाशयाच्या ग्रीवेपाशीच संपतो. स्त्रियांमध्ये मूत्रोत्साराचा मार्ग आणि लैंगिक स्रावाचा मार्ग वेगवेगळा असतो. पुरुषांमधील मूत्रनलिकेच्या मुखापेक्षा स्त्रियांमधील योनीचे मुख मोठे असते आणि ही दोन्ही मुखे भगोष्ठाने सुरक्षित केलेली असतात. योनीचा आतील साचा घडीसारखा असतो आणि समागमादरम्यान शिश्नासाठी तो घर्षण तयार करू शकतो. कामोत्तेजित अवस्थेत तयार होणारे स्राव योनीत शिश्नाचा प्रवेश सुलभ करवितात.
स्थान आणि रचना
मानवी योनी हा स्थितीस्थापक स्नायुमय मार्ग असून तो गर्भाशयाच्या ग्रीवेपासून योनिकमलापर्यंत असतो. योनीचे आतील अस्तर स्तरित पट्टकी उपकलेने बनलेले असते. या अस्तराखाली अरेखित स्नायूंचा स्तर असतो. हा स्तर संभोगादरम्यान आणि अपत्यजन्मावेळी आकुंचन पावू शकतो. स्नायूंच्या स्तराखाली बाह्यस्तर नावाच्या संयोजी ऊतीचा पट्टा असतो.
शारीर भेद असले तरी जननक्षम कालावधीतील स्त्रीच्या अनुद्दिपित योनीची लांबी अग्रभित्तिकेत सुमारे ६ ते ७.५ सेंमी तर पश्चभित्तिकेत सुमारे ९ सेंमी असते. संभोगादरम्यान योनीची लांबी आणि रुंदी वाढते. स्त्री सरळ उभी असताना योनीनलिकेची दिशा ऊर्ध्व-पश्चमुखी असते आणि ती गर्भाशयाशी ४५ अंशांहून थोड्या अधिक मापाचा कोन करते. योनीमुख हे योनिकमलाच्या पुच्छाकडील बाजूस मूत्रनलिकेच्या मुखामागे असते. योनीचा वरचा एक-चतुर्थांश भाग गुदांत्रापासून (मलाशय) गुद-गर्भाशय कोष्ठाने वेगळा झालेला असतो. सस्तनी प्राण्यांमधील इतर बहुतेक निरोगी आंतरिक श्लेष्मल पटलांप्रमाणे योनी व योनिकमलाचा आतला भाग लालसर गुलाबी रंगाचा असतो.
योनीमुखाजवळील बार्थोलिनच्या ग्रंथी व ग्रीवा योनीला वंगणासाठी स्राव पुरवितात. अंडमोचनावेळी आणि त्याआधी ग्रीवेतील श्लेष्मल ग्रंथी वेगळ्या प्रकारचा स्त्राव निर्मितात. हा स्राव योनिमार्गाला अल्कधर्मी बनवितो, त्यामुळे शुक्रजंतूंचा टिकाव सुलभ होतो.
योनिच्छद हे पटल बाह्य योनिमुखाच्या भोवती असते किंवा ते योनिमुखाला काहीसे आच्छादित करते. योनिप्रवेशाने ही ऊती ध्वस्त होतेच असे नाही. योनिच्छद शाबूत असणे हा भूतकाळात संभोग झालेलाच नसण्याचा खात्रीलायक पुरावा नसतो.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!