डॉ. सर मोरोपंत विश्वनाथ जोशी (१८६१-५ एप्रिल १९६२) हे तत्कालीन मध्य प्रांतातल्या (’सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार’मधल्या) अमरावती शहरातील एक विख्यात बॅरिस्टर वकील होते. ते मध्य प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. १९३३मध्ये ते तेथून निवृत्त झाले. तत्पूर्वी त्यांनी त्यांच्याकडे असलेले गृहमंत्रिपद १९२५ साली सोडले होते.
त्यांनी नागपूर विद्यापीठाची साहित्यातील डॉक्टरेट मिळवली होती. ’
मोरोपंत हिंदुस्थान सरकारच्या ’बाल विवाह प्रतिबंधक कायद्या’चे परीक्षण करणाऱ्या १० जणांच्या मंडळाचे सदस्य होते. हा कायदा २८-९-१९२९ रोजी पास झाला.
कौटुंबिक माहिती
मोरोपंतांच्या पत्नीचे नाव यशोदाबाई. त्यांनी आपल्या आयुष्याची जीवनगाथा ’ए मराठी सागा - दि स्टोरी ऑफ सर मोरोपंत आणि लेडी यशोदाबाई जोशी' नावाच्या इंग्रजी पुस्तकाद्वारे सांगितली आहे. हे पुस्तक यशोदाबाई आणि त्यांची कन्या माणिकबाई भिडे यांच्यातील संवाद या स्वरूपात आहे. संपादन वा.वि. भिडे यांनी केले आहे. हे पुस्तक २००३ साली प्रकाशित झाले.
चिंतामणराव ऊर्फ अप्पासाहेब पटवर्धनांची पत्नी सरस्वती ही मोरोपंतांची दुसरी मुलगी.
मो.वि. जोशी यांचे नाट्यप्रेम
वकिलीशिवाय मो.वि. जोशी यांना साहित्य, नाटक, कला व समाजकार्य या विषयांत रस होता. या सर्व क्षेत्रांत काम करताना त्यांनी आपल्या विद्वत्तेचा आणि ज्ञानाचा समाजाला उपयोग होईल असे पाहिले. मो.वि.जोशींना नाट्यकलेबद्दल आणि नाट्यकलावंतांबद्दल खूप प्रेम होते. नाटक हे मनोरंजनाबरोबरच प्रचाराचे उत्तम साधन असल्याची त्यांना जाण होती. नाटकांतील स्त्री-भूमिका स्त्रियांनीच कराव्यात या मताचे ते होते. यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. त्यांच्या विनंतीवरून अनेक स्त्रिया नाटकात काम करायला तयार झाल्या.
सन्मान
- मोरोपंत जोशी यांना ब्रिटिश सरकारने इंग्लंडच्या राजाच्या वाढदिवसाच्या दिवशी ’सरदारकी’ दिली होती.(१९२३); त्यामुळे मोरोपंत हे ’सर मोरोपत जोशी’ झाले.
- इ.स. १९२६ साली मोरोपंतांना ब्रिटिश सरकारने नाइट कमांडर ऑफ दि इंडियन एम्पायर ((KCIE) हा किताब दिला.
- मो.वि. जोशी यांची नाटकाबद्दलची आस्था पाहून त्यांना १९१२ साली अमरावतीत भरलेल्या ८व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला.