मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना २१ जुलै १९३५ रोजी झाली. मुंबई व उपनगर भागांत वार्षिक साहित्य संमेलने भरविणे, साहित्यविषयक प्रासंगिक चर्चा घडवून आणणे, आल्या-गेल्या साहित्यिकांचा परामर्श घेणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वर्ग चालविणे, स्वतःची नियतकालिके चालविणे, दरसाल एखाद्या विद्वान वक्त्यांची पूर्वनियोजित व्याख्याने करवून ती शक्य तेंव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध करणे, व्याख्यानमाला चालविणे, असे या साहित्य संघाच्या कार्याचे स्वरूप होते.
मराठी रंगभूमीस १९४३ साली १०० वर्षे पूर्ण होतात हे लक्षांत घेऊन त्यावर्षी महोत्सव करण्याची कल्पना त्याच अधिवेशनात निघाली. त्यावर्षी मुख्य महोत्सव सांगली येथे १९४३ च्या नोव्हेंबर महिन्यात झाला, तरी एप्रिल १९४४ मध्ये साहित्य संघाने मुंबई येथे खुल्या नाट्यगृहात मोठ्या प्रमाणावर नाट्योत्सव पुनः साजरा केला, इतकेच नव्हे तर त्यानंतर दरसाल कमीअधिक प्रमाणात मुंबईत नाट्योत्सव साजरा करण्याची प्रथा पडली. ही प्रथा आजपर्यंत संघाने अव्याहत पाळली आहे.
खुल्या नाट्यगृहाची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली असली तरी अलीकडे मुंबईत व इतरत्र ती मुंबई मराठी साहित्य संघाने लोकप्रिय केली. १९४४ साली पहिला नाट्योत्सव साजरा करत असतानाच ‘साहित्य संघाच्या व तत्सम इतर संस्थांच्या साहित्यविषयक चळवळींकरिता व मुंबईतील नाट्यसंस्थांना प्रतिष्ठित समाजासमोर अल्प भाडयात नाट्यप्रयोग करून दाखवण्याची सोय करणे’ असा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला होता. तो तर साध्य केला गेलाच, परंतु त्यानंतर लवकरच गिरगावातल्या केळेवाडीतील जमीन संपादन करून संघाने तेथे एक अद्ययावत नाट्यगृह बांधले. ६ एप्रिल १९६४ रोजी या मुंबई मराठी साहित्य संघ नाट्यमंदिराचे उद्घाटन झाले
मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्यक्षेत्र
- कविसंमेलने
- ग्रंथनिर्मिती
- नाट्यमहोत्सव
- नाट्यसंमेलने
- नियतकालिके
- पारितोषिके
- प्रकाशने
- भाषाध्यापन
- व्याख्याने
- संदर्भ ग्रंथालय
- साहित्य संमेलने
- सभा संमेलने
- साहित्य जपणूक
- अन्य साहित्य सेवा
मुंबई मराठी साहित्य संघाने भरविलेली संमेलने
साहित्य जपणूक
गायक-अभिनेते आणि ‘ललितकलादर्श’ या नाट्यसंस्थेचे भालचंद्र पेंढारकर यांनी ‘मुंबई मराठी साहित्य संघात’ सादर झालेली विविध नाटके आणि अनेक साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफली या कार्यक्रमांचे त्या काळात ‘स्पूल टेप’वर ध्वनिमुद्रण करून ठेवले होते. त्यांनी केलेल्या या ध्वनिमुद्रणामुळे जुन्या नाटकांचा व कार्यक्रमांचा हा ऐतिहासिक ठेवा २००हून अधिक ध्वनिफितींच्या रूपात मुंबई मराठी साहित्य संघाने जपला आहे. साहित्य संघात सुमारे १९४० पासून सादर झालेली विविध नाटकांचा आणि विविध साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचा या खजिन्यात समावेश आहे. आविष्कार, कलावैभव, धी गोवा हिंदूू असोसिएशन, चंद्रलेखा, नाट्यमंदार, नाट्यसंपदा, पूर्णिमा थिएटर्स, ललितकलादर्श आदी नाट्यसंस्थांनी सादर केलेल्या काही नाटकांच्या प्रयोगांचे ध्वनिमुद्रण या ध्वनिफितींत आहे.
साहित्य संघात उपलब्ध असलेल्या ध्वनिफिती
- ‘अमर भूपाळी’ या चित्रपटाची ध्वनिफीत
- अब्दुल जफार खान यांचे सतारवादन आणि अन्य काही कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रण
- आचार्य अत्रे यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेला कार्यक्रम
- अविष्कार’ नाट्यसंस्थेने सादर केलेले ‘शांतता कोर्ट चालू आहे’
- कलावैभव संस्थेचे ‘महासागर’
- कुमार गंधर्व यांचे ‘मला उमजलेले बालगंधर्व’ या विषयावर केलेले भाषण
- नटवर्य केशवराव दाते यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांचा सांगता समारंभ
- ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’चे ‘लेकुरे उदंड झाली’
- ‘चंद्रलेखा’चे ‘गुड बाय डॉक्टर’
- दादा कोंडके यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’
- दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावरील निर्मात्या सुहासिनी मुळगावकर यांनी एकपात्री स्वरूपात सादर केलेल्या ‘संगीत स्वयंवर’ या नाटकाचा काही भाग
- नाट्यमंदार संस्थेचे ‘घनश्याम नयनी आला’
- नाट्यसंपदा संस्थेचे ‘महाराणी पद्मिनी’
- मामा पेंडसे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा
- मुंबई मराठी साहित्य संघाची ‘वाजे पाऊल आपुले’, ‘नटसम्राट’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘पती गेले गं काठेवाडी’, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ ही नाटके
- शाहीर साबळे यांचे ‘असूनी मालक खास घरचा’ हे लोकनाट्य
- वगैरे