मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वेमार्ग हा भारतीय रेल्वेचा एक प्रस्तावित द्रुतगती रेल्वेप्रकल्प आहे. या मार्गावरून बुलेट ट्रेन धावेल.
महाराष्ट्रातील मुंबई महानगरास गुजरातमधील अहमदाबाद शहरास जोडणाऱ्या या मार्गाच्या ५०८ किलोमीटर प्रवासापैकी सव्वाशे किलोमीटरचा हिस्सा महाराष्ट्रात आहे आणि बारापकी चार स्थानके (मुंबई बांद्रा-कुर्ला कॉंप्लेक्स, ठाणे, विरार आणि बोईसर) महाराष्ट्रात आहेत तर उरलेली आठ - वापी, बिलिमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आणंद, साबरमती आणि अहमदाबाद - ही गुजरातमध्ये आहेत.
या मार्गावरील गाड्यांचा कमाल वेग प्रतितास ३५० किलोमीटर असेल. ५०८ किमीचे अंतर २ तास ७ मिनिटांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. सर्व बारा स्थानकांवर थांबल्यास २ तास ५८ मिनिटे लागतील.
या मार्गाच्या बांधणीचा एकूण खर्च ९ खर्व, ७६ अब्ज, ३६ कोटी (९,७६,३६ कोटी) रुपये आहे. त्यापैकी जपान सरकारच्या जायका या संस्थेकडून ७९,१६५ कोटींचे कर्ज मिळणे अपेक्षित आहे. या कर्जावर फक्त ०.१ टक्के व्याजदर आकारला जाईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंधरा वर्षांनी परतफेड चालू होईल आणि ती ३५ वर्षे चालेल. परतफेडीचा कालावधी पन्नास वर्षांचा आहे. इ.स. २०२३-२४ पर्यंत बुलेट ट्रेनचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य केल्यास २०४० सालापासून परतफेड चालू होईल आणि तेव्हा मासिक हप्ता सुमारे दोनशे कोटी रुपये असेल.
जपानने दिलेल्या कर्जाव्यतिरिक्त लागणाऱ्या रकमेपैकी (१८,४७१ कोटी रुपये) निम्मा हिस्सा भारताचे केंद्र सरकार उचलेल आणि महाराष्ट्राला व गुजरातला प्रत्येकी पंचवीस टक्के भार सोसावा लागेल. त्यानुसार महाराष्ट्राला साडेचार हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम या प्रकल्पाला द्यावी लागेल.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे