मिलिंद बाबुराव तेलतुंबडे (मृत्यू १३ नोव्हेंबर २०२१) उर्फ जीवा किंवा दीपक हे माओवादी बंडखोर नेते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) चे केंद्रीय समिती सदस्य होते. ते दलित कार्यकर्ते आणि अभ्यासक आनंद तेलतुंबडे यांचे धाकटे भाऊ आहेत.[१][२]
कारकीर्द
तेलतुंबडे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर येथे झाला. इ.स. १९८० मध्ये त्यांनी आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला आणि चंद्रपूर येथील वेस्टर्न 'कोलफिल्ड्स लिमिटेड'मध्ये तंत्रज्ञ म्हणून रुजू झाले. तेव्हापासून ते 'पीपल्स वॉर ग्रुप'चा कार्यकर्ता म्हणून नक्षलवादी चळवळीत सामील होते. ते अखिल महाराष्ट्र कामगार युनियनचे सदस्य देखील होते.[३]
तेलतुंबडे हे 'भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)' च्या महाराष्ट्र युनिटचे सचिव झाले आणि त्यांना या पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य म्हणून नियुक्त केले गेले. माओवाद्यांसाठी सुरक्षित रेड कॉरिडॉर तयार करण्यासाठी ते महाराष्ट्र - मध्य प्रदेश - छत्तीसगड झोनचे प्रमुख होते.[४] [५]
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते २०१८ च्या भीमा कोरेगाव हिंसाचाराचा मुख्य फायनान्सर होते. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील मर्दिनटोला जंगल परिसरात महाराष्ट्र पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या २६ नक्षलवाद्यांमध्ये तेलतुंबडे यांचा समावेश होता.[६] ते एकूण ६३ गुन्ह्यांमधील फरारी आरोपी होते[७] आणि मृत्यूच्या वेळी त्यांच्यावर ५० लाखांचे बक्षीस देखील होते.[८]
संदर्भ