मागाठाणे लेणी ह्या मुंबई शहरातील बौद्धलेणी आहेत. इसवी सनाच्या ६व्या शतकात या लेण्यांची निर्मिती केली आहे. यामध्ये गौतम बुद्धांच्या बऱ्याच मूर्ती, चित्रे व अनेक कलाकृती आहेत.[१][२]
स्थान
मागाठणे हे गाव मुंबईतील दहिसर येथील पोयसर नदीच्या काठी स्थित आहे.
इतिहास
कान्हेरीच्या लेणी क्र.२१ मधील शिलालेखात ह्याचा मंगलकस्थान म्हणून उल्लेख आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात येथील शेतजमीन कल्याणच्या अपरेणु नामक व्यापाऱ्याने कान्हेरीच्या मठाला दान दिली होती. सीमेवर दोन लहानसे दगडी स्तूप होते. येथेच दुर्लक्षित लेणी आजही आहेत. मुंबईतील सर्वात प्राचीन पुष्करणी येथे होती जी आज गाळाने भरून गेलेली आहे. जवळच इसवी सनाच्या सहाव्या शतकात दगडात कोरलेली, पायऱ्यांची तीन लेणी आहेत. एक लेणे प्रशस्त आहे. दोन लेणी लहान आहेत. मुख्य लेण्यांच्या गर्भगृहात बुद्धमूर्ती आहे. ती गायत्री देवी म्हणून पूजली जात होती. इतर मूर्तींना पांडवांची नावे होती. लेण्यात देखणे अलंकरण होते. लेणी चारही बाजूंनी वस्तीचे वेढलेली आहेत. ब्रिटिश गॅझेटिअरमध्ये येथे काही शिलालेख असल्याचे उल्लेख आहेत. ठाणे गॅझेटिअरच्या तिसऱ्या खंडात येथील अनेक प्राचीन अवषेशांचे वर्णन आहे. ही बौद्ध लेणी कान्हेरीच्या मठाशी संलग्न होती.