मांजरा ही महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यांतून वाहणारी एक नदी आहे. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. गोदावरी नदीची ती एक प्रमुख उपनदी आहे. सुमारे ७२५ किमी. लांबीची ही नदी, सुरुवातीला पूर्ववाहिनी असून बीड-धाराशिव तसेच बीड-लातूर या जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे.
मांजरा नदीवर बीड जिल्ह्यातील केज येथील धनेगाव येथे मांजरा धरण (धनेगाव)आहे.कासारखेडजवळ ही नदी लातूर जिल्ह्यात प्रवेश करते व जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहताना आग्नेयेस जाऊन निलंगा गावाजवळ कर्नाटक राज्यात व पुढे बिदरच्या पूर्वेस तेलंगणा राज्यात प्रवेश करते. आंध्र प्रदेशातील संगरेड्डीपेटजवळ मांजरा नदी एकदम वळण घेऊन वायव्य दिशेने वाहू लागते. निझामाबाद जिल्ह्यात या नदीवर धरण बांधण्यात आले आहे. धरणाच्या तलावाला निझामसागर तलाव म्हणतात. पुढे ही नदी पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सरहद्दीपर्यंत येऊन नांदेड जिल्ह्यातील शेळगावपासून ईशान्येस, राज्याच्या सरहद्दीवरून वाहत जाते व याच जिल्ह्यातील कुंडलवाडी गावाजवळ गोदावरी नदीस उजवीकडे मिळते. तेरणा, कारंजा, तावरजा,लेंडी व मन्याड या मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.तसेच केज,चौसाळा,लिंबा,डिघोळ देशमुख,घरणी व रेणा या छोट्या नद्याही मांजरा नदीच्या उपनद्या आहेत. या नदीस तेरणा नदी लातूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर निलंग्याच्या पूर्वेस, तर कारंजा नदी आंध्र प्रदेश राज्यात मिळते, लेंडी व मन्याड या नद्या नांदेड जिल्ह्याच्या सरहद्दीवर या नदीला डावीकडून मिळतात.
मांजरा नदीवर लासरा,बोरगाव, अंजनपुर,वंजारखेडा,वांगदरी,कारसा, पोहरेगाव,नागझरी,साई,खुगपूर,शिवानी,घरणी,बिङ्गिहाल,डोंगरगाव, होसुर,भुसनी हे बॅरेज स्व.विलासरावजी देशमुख यांनी केले.
मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी केला जातो. नदीखोरे सुपीक असल्याने येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या नदीच्या वरच्या खोऱ्यात मुख्यत्वे उसाचे पीक घेतले जाते.तर खालच्या खोऱ्यात ज्वारी, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन होते. बहुतेक ठिकाणी नदीकाठ मंद उताराचे असल्याने या नदीचा फेरी वाहतुकीसाठीही थोड्याफार प्रमाणात उपयोग होतो.