| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शनहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
महादेव कोळी किंवा कोळी महादेव ही कोळी जमातीची एक उपजमात आहे असे मानववंश शास्त्रज्ञ एन्थोविन सांगतो. कोळी शब्दामधील को म्हणजे डोंगर आणि ळी म्हणजे एक जमात म्हणजे डोंगरात राहणारी जमात ला कोळी म्हणतात असे तो त्याचे पुस्तक द ट्राईब्ज अँड कास्ट्स ऑफ बॉम्बे मध्ये नमुद करतो. कोळी महादेव हे बाला घाट डोंगर रांगा तसेच महादेव डोंगररांगामध्ये वास्तव्य करत, कालांतराने ते डोंगराहून खाली आले. या जमातीतील लोक महादेव डोंगरात राहत असल्याने तसेच महादेवाचे पूजक असल्याने त्यांना कोळी महादेव म्हटले जाते.
या जमातीचे उगमस्थान हे मध्य-प्रदेशमधील सातपुडा पर्वतातील महादेव डोंगर आहे. तेथून ही जमात कालांतराने इ.स. १४०० च्या सुमारास स्थानांतरित व्हायला लागली. हळु हळु या जमातीचे लोक डोंगराळ भागातून समतल भागात आले. जे प्राथमिक स्थानांतर झाले, ते बालाघाट प्रांतात झाले, त्या काळातील बालाघाट म्हणजेच आजचा बेरार(विदर्भ) आणि बेरारला लागून असलेले मध्य प्रदेशमधील पर्वतीय क्षेत्र. यातील काही लोकांनी बेरार प्रांतात म्हणजेच अमरावती, अकोला,बीड,वाशीम अशा जिल्ह्यात स्थायिक होऊन तिथेच आपली उपजीविका सुरू केली, ज्यात मजुरी करणे, वनराईत जाऊन डिंक गोळा करणे, तर काहींनी शेतीला पण सुरुवात केली. उरलेले लोक हे पुढे बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यातून अहमदनगर, नाशिक, पुणे मधील प्रांतात पसरले.
पुणे भीमाशंकर ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात दाट संख्येने वसलेली आहे, पुणे, अहमदनगर ,नाशिक या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. तसेच संपुर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्येही आढळतात. महादेव कोळी ज्या प्रदेशात राहत असे त्यास पूर्वीस कोळवण असे संबोधले जात असे. कोळवण म्हणजे कोळ्यांचे वन किंवा कोळ्यांचे रान होय.याचाच अर्थ महादेव कोळयांची वस्ती प्रामुख्याने दऱ्याखोऱ्यात असे. महादेव कोळी जमातीचे मुळ वसतिस्थान महादेव डोंगर असल्याचे काही इतिहासकारांचे आणि युरोपियन अभ्यासकांचे मत आहे. महादेव डोंगरापासून बालेघाटद्वारे हे लोक महाराष्ट्रात आले असावेत. आजही या भागातील लोकगीतांतून बालेघाटाचा उल्लेख असलेली गाणी लोक गातात. महादेव कोळी हे नाव कसे पडले याला ऐतिहासिक पुराव्यांचाही आधार मिळतो. हैद्राबाद राज्य आणि बिदर यांच्या सरहद्दीवर महादेव डोंगराच्या रांगा (Mahadev Hills) आहेत. महादेव कोळी जमात प्राचीन काळी या डोंगराच्या रांगात राहत असावी असे म्हटले जाते. तेथून ते बालेघाटाच्या रांगा ओलांडून महाराष्ट्रात आले. मध्य भारतातील कोल वंशाच्या जमातीशी त्यांचे बरेच साम्य असल्यामुळे त्यांना कोलवंशी असे म्हणतात.
देवदेवता
महादेव कोळ्यांची गोत्रनावे व कुळांची नावे अनेक आहेत. महादेव कोळ्यांची वरसूबाई ही रोग बरी करणारी विशेष देवता आहे. महादेव कोळी समाजाच्या धर्मविषयक कल्पना, सणवार आणि आचार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. वाघ्यादेव(वाघोबा), हिरवा, पांढरी, बयरोबा,काळोबा,वरसुआई,महादेव इत्यादी देव मानतात. सात, घट बसवणे,मोडा पाळणे,वाघ बारस, आखाजाचा पाडवा वगैरे सण पाळतात. कळमजाई देवीलाही पूजतात. कळसूबाई, जाकूबाई, सतूबाई, रानाई ,घोरपडाई,देवींला मानतात. शेतात खूप गवत माजले, तर ‘कणसरी’ची प्रतिमा करून शेतात ठेवतात. हिंदू धर्माच्या संपर्कात आल्याने विठोबाचे माळकरीही समाजात आढळतात. परंतु आता बदल होत आहे. आपण धर्म संकल्पनेत येत नाही याची त्यांना जाण होऊ लागली आहे. त्यामुळे माळकरी टाळकरी यांच्यात घट होऊन आदिवासी तयार होत आहेत. नवस आणि मंत्रतंत्रावर फार विश्वास असला तरी शिकलेली पिढी यावर आता विश्वास करत नाही. समाजात भगताचे महत्त्व असाधारण आहे. आज शिक्षणामुळे काही प्रमाणात त्यांच्या बुवाबाजीत सकारात्मक बदल होत असल्याचे चित्र आहे. छत्रपती शिवाजी राजे बालपणी शिवनेरी वर वाढले त्या काळामध्ये जुन्नर प्रांत मधील महादेव कोळी जमातीशी त्यांचा संबंध आला. स्वराज्याचा सुरुवातीचा काळात छत्रपतींना जुन्नर प्रांत मधील शूर वीर महादेव कोळी समाजाचा पाठिंबा होता. म्हणूनच शिवाजी राजे महादेव कोळ्यांचे आराध्य दैवत आहे.
रूढी व परंपरा
समाजातील संस्कार म्हणजे प्रथम ऋतुदर्शनात मुलीची खणा-नारळाने ओटी भरतात. गरोदर स्त्रीचे ओटीभरण करीत नाहीत. स्त्रीचे पहिले बाळंतपण सासरी होते. बाळंतीण बाज वापरीत नाही. जमिनीवरच झोपते. हलिंद(??) व बाळंतिणीला बाजरीचे पीठ कातबोळ्याबरोबर शिजवून देतात. त्याने तिला दूध येते, अशी समजूत आहे. पाचवीला सटवीची पूजा करतात. जमलेल्या आप्तेष्टांत पाच भाकऱ्या व चण्याच्या घुगऱ्या वाटतात. षष्ठीपूजनाच्या वेळी सावा धान्याच्या दोन राशी जमिनीवर ठेवतात. त्यांना देवता समजून हळद-कुंकू वाहतात. त्यांच्यापुढे भात आणि तीळ यांचे पाच लाडू ठेवतात. त्यांतला एक तीळ-तांदळाचा लाडू बाळंतीण घरातील मोरीला अर्पण करते. बाळंतिणीच्या खोलीत भिंतीवर अकरा मानवाकृती काढतात. त्यांत ‘बाहुला’ ऊर्फ ‘बळी’ नावाची एक आकृती असते. तिचे डोके शेंदराने काढतात आणि पूजा करतात. त्यांना दूध, दही, खेकडा यांचा नैवेद्य दाखवतात. मूल रांगू लागले, की पंचपावली करून कुळदेवतेची पूजा करतात. मुलाचे नाव दहाव्या दिवशी ठेवतात व जावळ काही महिन्यांनी काढतात. जावळ काढण्याचा मोठा समारंभ असतो. जावळ गुरुवार, शुक्रवार अगर रविवार या दिवशी काढतात. मूल पाऊल टाकू लागले, की पावलाच्या आकाराएवढ्या तांदळाच्या पिठाच्या पाच आकृत्या करून त्या उकडून काढतात व पाच शेजाऱ्यांना वाटतात. समाजात मृताला जाळतात किंवा काही भागात पुरतात. लग्न गोत्र पाहून होते. एवढेच नव्हे, तर विशिष्ट गोत्रांतच विवाह होतात.
या समाजामध्ये बालविवाह प्रचलित नव्हता, आताही होत नाहीत. परंतु एकंदरीत आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुलांना शिकविण्याऐवजी त्यांचे लग्न लवकरात लवकर लावण्याचाच प्रयत्न केला जातो. लग्न वडील माणसांमार्फत ठरते. मुलीचे द्याज देतात. प्रथम साखरपुडा होतो. लग्न मुलीच्या घरी मांडवात होते. लग्नात खूपच बारीकसारीक विधी असतात. आदिवासी महादेव कोळ्यांमध्ये हुंडा घेतला जात नाही व दिलाही जात नाही.
उपजीविका व व्यवसाय
महादेव कोळी समाजातील लोकांचा व्यवसाय शेती व जंगलातला रान मेवा गोळा करण्याचा असतो. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. जंगलातून गोळा करून आणलेल्या वस्तू विकूनही पुरेसे पैसे मिळत नाही. जंगलातील वनोपजाचे व्यवस्थापन व वापराचे हक्क या समाजाला मिळाले तर दोहोंची समृद्धी शक्य आहे.[१] तसेच अकोले तालुक्यातील महादेव कोळी समाज देखील रानं मेव्यावर विशिष्ट भर देतो.
इतिहास महादेव कोळ्यांच्या शिवनेरीवर झालेल्या संहाराचा
शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला महादेव कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत.
संदर्भ
- हैदराबाद नेमक जिल्हे अर्थात बेरार- १८७७
- ठाणे गॅझेटीअर- १८८१,
- अहमदनगर गॅझेटीअर - १८८१,
- अकोला गॅझेटीअर - १८८१,
- अमरावती गॅझेटीअर-१८८१,
- इमपेरियल गॅझेटीअर ऑफ इंडिया - १९०९
- द ऍबओरिजनल प्रॉब्लेम इन द सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार - १९४०