भरतनाट्यम् ही एक प्राचीन अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैली आहे.[१] भरतनाट्यम् प्राचीन असले तरी त्याला मध्ययुगात तामिळनाडूमध्ये प्रोत्साहन मिळाले.भरतनाट्यमचा शोध भरतमुनी यांनी लावला.
परिचय
भाव, राग, ताल व नाट्य ही भरतनाट्यमची चार मुख्य अंग असतात. या अंगांची आद्याक्षरे व नाट्य मिळून भरत-नाट्य असे नाव पडले असे म्हणतात. दुसऱ्या मतानुसार भरतमुनी जनक असल्याने भरताचे नाट्य म्हणून यास भरतनाट्यम म्हणले जाते .[२] या नृत्यास दासीअट्ट्म व सदिर (Sadir) या नावानेही ओळखले जाई.
स्वरूप
या शैलीचा उगम दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये झाला.[३] ही एकल नृत्यशैली असून भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित आहे. भरतनाट्यमचे सादरीकरण कर्नाटकी संगीताच्या साथीने होते. या नृत्य पद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे. यात मृदंगम,तालम,वीणा,बासरी ,घटम आदि वाद्यांची साथसंगत असते. चेन्नय्या पोन्नय्या शिवानंद आणि वडिवेल या तंजावूर बंधू म्हणून मान्यता पावलेल्या संगीतकारांनी या नृत्याचा मार्गम रचला आणि त्याच क्रमाने आजही नृत्य प्रस्तुती करण्याची पद्धत आहे. सुरुवातीला मंदिरात केली जाणारी ही कला नंतर राजदरबारात आणि रंगमंचावर सादर केली जाऊ लागली. पूर्वी देवपूजेचा भाग म्हणून देवदासी देवळात नृत्य करत. देवालयांना आणि देवदासींना राजाश्रय असे.[४] तंजावूरच्या चोल, नायक आणि मराठी राजांनी या नृत्य कलेला भरपूर प्रोत्साहन दिले.
शिक्षणपद्धती
भरतनाट्यम विद्यार्थी सुरुवातीस घुंगरूंशिवाय नाचणे शिकतात. ज्यावेळी गुरूस वाटते की विद्यार्थ्याची पुरेशी तयारी झालेली आहे तेव्हा गुरू विद्यार्थ्याकडून सलंगाई पूजा करवून घेतात व त्यावेळी घुंगरू प्रदान केले जातात. अधिक खडतर शिक्षणानंतर विद्यार्थ्याने एकट्याने किंवा एकटीने संपूर्ण कार्यक्रम करणे अपेक्षित असते. याला अरंगेत्रम असे नाव आहे. अरंगेत्रम नंतर गुरू आपल्या शिष्यास इतर कार्यक्रमांतून नृत्य करण्यास परवानगी देतात.[५] भरतनाट्यम ही नृत्य शैली परंपरेनुसार केवळ स्त्रीने सादर करण्याची एकल नृत्य शैली आहे पण रंगमंचावर नटवूणार, मृदंग वादक, गायिका, व्हायोलीन आणि बासरी वादक असे साथीदार असतात.[६]
श्रेष्ठ कलाकार
भरतनाट्यम पूर्वी मंदिरातील देवदासींद्वारे केला जाई. या नृत्याचे स्वरूप पुढे पन्ननलूर,वल्डवूर ,तंजावर येथे विकसित झाले आणि ह्या भरातनाट्यमच्या प्रमुख बाणी मानल्या जातात. टी बाल सरस्वती, मोना पिल्ले, रूक्मिणी अरुंदले, मीनाक्षी सुंदरम पिल्लै, चिट्टप्पा पिल्लै, रामय्या पिल्लै, लीला सॅमसन, सुचेता चापेकर आदी भरतनाट्यमच्या श्रेष्ठ कलाकारांपैकी काही नावे आहेत. आज अनेक भरतनाट्यम नर्तकानी त्यांच्या कर्तृत्वाने ह्या कलेला जगभरात सन्मान आणि प्रसिद्धी मिळवून दिलीये. त्यातील काही पुढीलप्रमाणे- एस. कनक,सुधा राणी रघुपध्याय, प्रा. सी.वी. चंद्रशेखर, चित्रा विश्वेश्वरन, अलरमेल वल्ली, डॉ.पद्मा सुब्रमण्यम, पार्श्वनाथ उपाध्याय, मालविका सारुकाई, कमला लक्ष्मण, जयश्री नायर, प्रतिभा प्रल्हाद, अनिता रत्नम, रमा वैद्यनाथ, प्रियदर्शनी गोविंद, इंदिरा कादंबी, मीनाक्षी श्रीनिवासन, इत्यादी.