नवविधा भक्तिमार्गामध्ये भक्ती नऊ प्रकार सांगितलेले आहेत. प्रत्येकाने अहंकार बाजूला ठेवूनच परमेश्वराची आराधना व सेवा केली पाहिजे असे या मार्गात मानले जाते. भजन हा भक्तिमार्गामध्ये सर्वात सोपा प्रकार मानला जातो. भक्तिमार्ग, योगमार्ग आणि ज्ञानमार्ग हे परमेश्वर प्राप्तीचे मुख्य मार्ग होत असे भारतीय तत्त्वज्ञान मानते. पतंजलींनी भक्तिमार्ग आणि अष्टांग योग असे योगशास्त्राचे दोन भाग केले आहेत.
इतिहास
वायू पुराणात भक्तिमार्गाचा उल्लेख आढळतो.
भक्तिमार्गा ज्ञानमार्गा वैराग्यानिलनीरजाः।
उपासनविधिश्चोक्तः कर्मसंशुद्धिचेतसाम् ।। ४२.१५ ।।
ज्ञानेश्वर आणि नामदेव या संतांनी तेराव्या शतकात समताधिष्ठित सहज आणि सोपा भक्तिमार्ग लोकांपुढे सांगितला. मराठी संत तुकाराम यांनी भक्तिमार्गाची शिकवण अभंग रचनेत दिली आहे. रामदास स्वामी रचित दासबोध या ग्रंथात समास पहिला : ग्रंथारंभलक्षण येथे भक्तिमार्गाची महती सांगितली आहे.
ग्रन्था नाम दासबोध | गुरुशिष्यांचा संवाद |
येथ बोलिला विशद | भक्तिमार्ग
गजानन महाराज यांनी ही हीच शिकवण पुढे नेली आहे. श्रीमद भगवद्गीता या ग्रंथात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भक्तियोगाचा उपदेश केला आहे.(अध्याय बारावा)
आंतरराष्ट्रीय स्वरूप
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ या चळवळीने भक्तिमार्ग जगभरात पोहोचवला आहे. हिंदू धर्मातील महत्त्वाची तत्त्वे साध्या सोप्या रितीने त्यांनी विविध भाषेत आणली आहेत. त्या सर्वात भक्तिमार्ग सर्वात महत्त्वाचा मानला आहे.