जनरल बिपीन रावत (PVSM, UYSM, AVSM, YSM, SM, VSM, ADC) (१६ मार्च १९५८ - ८ डिसेंबर २०२१) हे भारतीय लष्करातील 'फोर स्टार रँक' धारक जनरल होते. ते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) होते. ३० डिसेंबर २०१९ रोजी, त्यांची भारतातील पहिली CDS म्हणून नियुक्ती झाली आणि १ जानेवारी २०२० पासून त्यांनी पदभार स्वीकारला. CDS म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी, त्यांनी ५७ वे आणि शेवटचे कर्मचारी समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. तसेच भारतीय लष्कराचे २६ वे लष्कर प्रमुखदेखील होते. २०२२ साली त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.[१]
सुरुवातीचे आयुष्य आणि शिक्षण
रावत ह्यांचा जन्म उत्तराखंड येथील पाउरी येथे १६ मार्च १९५८ रोजी एका हिंदू कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या कुटुंबामधील अनेक पिढ्या भारतीय लष्करामध्ये काम करीत होत्या.[२] त्यांचे वडील लक्ष्मण सिंघ रावत हे पाउरी गढवाल जिल्ह्यातील सैंज ह्या गावामध्ये वाढले होते आणि नंतर लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोचले होते. बिपीन रावत ह्यांची आई उत्तरकाशी जिल्ह्याचे माजी आमदार किशन सिंघ परमार ह्यांची मुलगी होत्या.[३]
मृत्यू
८ डिसेंबर २०२१ रोजी एक भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर ( Mi- 17VH हेलिकॉप्टर) मधून जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि इतर ११ व्यक्ती प्रवास करत असताना तामिळनाडूमधील कुन्नूर येथे या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातात मेजर रावत यांच्यासहित तेरा व्यक्तींचा मृत्यू झाल्याची लष्करातर्फे पुष्टी करण्यात आली आहे.[४] मृत्यूसमयी त्यांचे वय ६३ वर्षे होते.
संदर्भ