बांको दै मेदिची तथा मेदिची बँक ही १५ व्या शतकात (१३९७-१४९४) इटलीमधील मेदिची कुटुंबाने स्थापन केलेली बँक व आर्थिक संस्था होती. आपल्या चढतीच्या काळात ही युरोपमधील सर्वात मोठी आणि सर्वात प्रतिष्ठित बँक होती. काही अंदाजांनुसार या बँकेच्या मालकीमुळी मेदिची कुटुंब काही काळ युरोपमधील सर्वात श्रीमंत कुटुंब होते. आजच्या पैशात त्यांच्या संपत्तीचा अंदाज लावणे कठीण आहे कारण त्यांच्या संपत्तीमध्ये दुर्मिळ कलावस्तू, जमिनी आणि सोने होते. या आर्थिक संपत्तीचा वापर करून मेदिचींनी सुरुवातीला फिरेंझेमध्ये आणि नंतर इटली आणि युरोपच्या विस्तृत क्षेत्रात राजकीय सत्ता संपादन केली.
या बँकेची स्थापना १३९७मध्ये जियोव्हानी दि बिक्की दे मेदिचीने फिरेंझे शहरात केली. फिरेंझे शासनात त्याचा थोडा प्रभाव असला तरीही त्याचा मुलगा कोसिमो दि जियोव्हानी दे मेदिचीने १४३४मध्ये ग्रान माएस्त्रो दि फिरेंझेचे पद स्वीकारल्यानंतर पुढची ६० वर्षे या बँकेद्वारे मेदिचींनी फिरेंझेवर अनभिषिक्त शासन केले.
या बँकेने ठेवी आणि पैसे काढण्याच्या द्विनोंदी पद्धतीचा शोध लावून सिस्टमच्या विकासाद्वारे मेदिची बँकेने अग्रगण्य बँकिंग आणि अकाउंटिंगच्या व्यवसायांमध्ये मोठी सुधारणा केली. सामान्य खातेवहीमध्ये नोंदण्यांच्या प्रणालीमध्येही या बँकेत सुधारणा केल्या गेल्या.