महाराष्ट्र राज्य 'तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' (२०१९)
बशीर मोमीन कवठेकर (जन्म: १ मार्च १९४७, मृत्यः १२ नोव्हेंबर २०२१) एक भारतीय साहित्यिक आहेत ज्यांनी मराठी भाषेत लावणी, वगनाट्य, नाटक, धार्मिक भक्तिगीते, देशभक्तीपर गीते याबरोबरच विविध प्रकारची लोक गीते लिहिली आहेत[२]. हुंडाबंदी, दारूबंदी, निरक्षरता, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार यांसारख्या ज्वलंत विषयांवर त्यांनी लेखन करीत त्यामाध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न केले[३]. व्यसनमुक्ती, राष्ट्रीय साक्षरता अभियान, ग्राम स्वछता अभियान यासारख्या शासकीय चळवळी मध्ये सुद्धा त्यांनी हिरहिरीने भाग घेतला आणि आपल्या कलापथकाच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले[४]. लोककला, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१८चा 'विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार' त्यांना देऊन गौरविले आहे [५].
महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाप्रकार असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी त्यांनी वगनाट्ये, लावण्या, लोकगीते, सवाल-जवाब, गण-गवळण आणि फार्स असे विविधांगी साहित्य निर्माण केले आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख तमाशा मंडळांना पुरवले[६][७][८]. त्यांनी रंगमूभिवर नाटक, तमाशात वगनाट्य आणि जनजागृतीसाठी पथनाट्यात सुद्धा अभिनय केला आहे. गेल्या दोन दशकांपासून ते तरुण कलावंतांना मार्गदर्शन करीत आहेत[९]. असंगठित कलावंतांना संगठीत करून त्यांच्यासाठी आरोग्य मेळावा, गरीब कलावंतांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती, वृद्ध कलाकारांना मानधन अशा विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. मराठी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते परंतु त्यांनी आपल्या साहित्यात ग्रामीण बोली भाषेचा प्रामुख्याने वापर केला आणि त्यांच्या याच शैलीमुळे त्यांचे साहित्य जण- सामान्यांत सहज लोकप्रिय झाले[१०].
बालपण आणि शिक्षण
मोमीन कवठेकरांचा जन्म मार्च १९४८ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कवठे यमाई या दुष्काळग्रस्त गावातील एका मुस्लिम विणकर कुटूंबात झाला. गावात जागरण-गोंधळ, भारुड, तमाशा अशा विविध कलाप्रकारांमध्ये निपुण असणाऱ्या कलाकारांची परंपरा आहे. साहजिकच बालपणी मोमीन कवठेकर यांना हे सर्व कलाप्रकार आणि कलावंत जवळून पाहायची संधी मिळाली आणि नकळत त्या बालमनावर कला क्षेत्र साठीची आवड वाढत गेली[११].
मोमीन कवठेकर यांनी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. गावात उच्च माध्यमिक शाळा नसल्यामुळे कवठे येथील सर्व विद्यार्थ्यांना दहा किमी अंतरावर असलेल्या ‘लोणी-धामणी’ या गावी जावे लागत असे. घरातील कामे आणि रोजचा प्रवास कठीण वाटल्यामुळे आठवी इयत्ता पूर्ण केल्यानंतर त्यांनी शाळा सोडली आणि आपल्या वडिलोपार्जित व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली.
कलाजगतात प्रवेश
मोमीन कवठेकर यांनी वयाच्या ११ व्या वर्षी पहिले गाणे लिहिले आणि ते एका शालेय कार्यक्रमात सादर केले. प्रेक्षकांकडून त्यांचे कौतुक झाले आणि यातून मोमीन कवठेकरांना प्रोत्साहन मिळाले. ‘गंगाराम कवठेकर’ यांच्या तमाशा मंडळात त्यांनी व्यवस्थापन बरोबरच वगनाट्यामध्ये विविध भूमिका केल्या. आपल्या फावल्या वेळात ते गण-गवळण, लावणी, लोकगीते असे तमाशाच्या कार्यक्रमात सादर करता येतील अशाप्रकारचे उपयुक्त लिखाण करत असत[१२]. यातील लोकगीते आणि वगनाट्ये जेंव्हा रंगमंचावर सादर झाली तेंव्हा प्रेक्षकांची दाद मिळाली. त्यांची गाणी ग्रामीण भागात लोकप्रिय होऊ लागली आणि त्यामुळे विविध तमाशा फडमालक मोमीन कवठेकर यांना भेटून, नवीन गाणी आणि वगनाट्य लिहून देण्यास आग्रह करू लागली[१३]. ‘रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर’, ‘अमन तांबे’, ‘लक्ष्मण टाकळीकर’ , ‘काळू-बाळू कवलापूरकर’, 'दत्ता महाडिक पुणेकर’, ‘पांडुरंग मुळे मांजरवाडीकर’, ‘मालती इनामदार’, ‘संध्या माने' आणि 'लता-सुरेख पुणेकर' अशा इतर तमाशा फडांसाठी सुद्धा त्यांचे लिखाण काम सुरू झाले[१४]. तथापि, आपल्या या लेखनासाठी त्यांनी कधीही पैसे घेतले नाहीत[१५]. आपल्या सहज सुलभ भाषेतील लेखनाने त्यांनी तमाशा फड मालकांची तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांची लोकप्रियता शिगेला पोचली[१६][१७].तमाशा कोणताही असो परंतु मोमीन कवठेकरांचे लिहिलेले गीत सादर करावे अशी फर्माईश चाहते करत असत[१८].लोककला सादर करणाऱ्या कलाकारांसाठी त्यांनी पोवाडे, कलगीतुरा, भारुडे, विनोदी कोट्या, सद्यस्थितीवरील गीते असे गद्य-पद्य प्रकारातील वैविध्यपूर्ण साहित्य निर्माण केले[१९][२०].
अभिनय:
मोमीन कवठेकर यांनी रंगभूमीवर अभिनयाची छाप सोडताना 'नेताजी पालकर' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' या नाटकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची, 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' या नाटकात मोगल बादशहा औरंगजेबाची तर 'भ्रमाचा भोपळा' या नाटकात तुतीयपंथीयाची भूमिका साकारली[२१].'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' या नाटकाचे व्यवसायिक प्रयोग भरत नाट्य मंदीर पुणे तसेच महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सुद्धा सादर करण्यात आले.
१९९० च्या दशकात जसजसे दूरचित्रवाणी संच, व्हीसीआर, केबल नेटवर्क गावोगावी पोचले तसतसे तमाशा बद्दलचे आकर्षण कमी झाले, प्रेक्षक रोडावला आणि फडमालक आर्थिक अडचणीत येऊ लागले. या महत्त्वपूर्ण टप्प्यात, मोमीन कवठेकर यांनी विविध फडमालकांना डिजिटल पर्यायांवर काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि स्वतः सुद्धा काही म्युझिकल ऑडिओ अल्बम (सीडी)ची निर्मिती केली. तांत्रिक बदल लक्षात घेऊन तमाशा फड मालकांनी सुद्धा सोशल मीडियाचा वापर करावा असा त्यांचा आग्रह होता जेणेकरून ही कला टिकून राहील[२२]. प्रख्यात कॉमेडियन भाऊ कदम उर्फ भालचंद्र कदम यांच्या ‘व्हीआयपी गाढव’[२३] आणि आगामी ‘भाऊंचा धक्का’ या दोन मराठी चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत[२४].
साहित्य निर्मिती
मोमीन कवठेकर यांनी ४०००हून अधिक लोकगीते लिहिली आहेत आणि त्यातील भरपूर गाणी ही ग्रामीण भागातील विविध लोककलाकार गेली ४०-५० वर्ष सादर करीत आहेत[२५]. त्यांच्या गाण्यांच्या संग्रहात ‘लावणी, ‘गण-गवळण, ‘कविता, ‘भक्तीगीते, ‘पोवाडे' अशा प्रकारचे वैविध्यपूर्ण साहित्य आहे[२६]. मोमीन कवठेकरांचे साहित्य हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जवळपास तीन दशक तमाशा क्षेत्राला वरदान ठरले होते[२७][२८].मोमीन कवठेकर यांनी छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मिती व तदनंतरच्या ऐतिहासिक घटना आणि व्यक्तिमत्त्वावर आधारित दोन नाटके सुद्धा लिहिली आहेत. त्यांनी 'प्रौढ साक्षरता अभियान', 'ग्राम स्वच्छता अभियान –स्वच्छ भारत', 'एड्स बद्दल जनजागृती', 'हुंडाबळीचे दुष्परिणाम', 'व्यसनमुक्ती’ अशा सामाजिक विषयांवर लघु कथा /पथनाट्ये/ गाणी लिहिली आहेत आणि ग्रामीण महाराष्ट्रात सादर केली आहेत[२९].मोमीन कवठेकर यांचे वैविध्यपूर्ण लेखन आणि त्यांच्या साहित्याची ग्रामीण भागात असेलेली लोकप्रियतेची नोंद घेत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात त्यांच्या साहित्यावर पीएच.डी.करण्यात आली आहे.[३०][३१][३२] लोकभिमुख ग्रामीण भाषेचा बाज असलेल्या लिखाण शैलीमुळे त्यांचे साहित्य सामन्यांना सहज समजण्या जोगे आणि मनाला भावणारे असल्यामुळे लोकप्रिय झाले[३३].
नाटक:
'भंगले स्वप्न महाराष्ट्राचे' - छत्रपती राजाराम भोसले त्यांच्या नेतृत्वाखाली संताजी-धनाजी यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी मुघल साम्राज्याविरुद्ध केलेल्या संघर्षावर आधारित[३४]. १९७५ मध्ये आणिबाणी च्या माध्यमातून भारतीय लोकशाहीला खीळ घालण्यात आली आणि अशा कठीण प्रसंगी, बशीर मोमीन यांनी 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' हे ऐतिहासिक संदर्भ असेलेले नाटक लिहिले आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुणे येथे रंगमंचावर सादर केले. हे नाटक प्रतिकात्मक स्वरूपात, तत्कालीन दिल्ली सरकारने लोकशाही वर केलेल्या आक्रमणाला धैर्याने परतवून लावण्यासाठी जनतेला प्रेरणा देणारे ठरले.[३५].
'वेडात मराठे वीर दौडले सात' - मराठा साम्राज्याचे तिसरे सेनापती प्रतापराव गुजर यांनी केवळ सहा सरदारांना बरोबर घेऊन बहलोल खानाच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यावर आधारित[३६].
'लंका कुणी जाळली' - हा एक गमतीशीर घटनेवर आधारित फार्स आहे
सामाजिक विषयांवर पथनाट्य:
शाहू-फुले-आंबेडकर यांच्याशी वैचारिक बांधीलकी जपणाऱ्या मोमीन कवठेकर यांनी समाजोपयोगी ज्वलंत विषयांवर लेखन केले आणि जनजागृतीसाठी अथक प्रयत्न केले. यातील काही पथनाट्ये पुणे आकाशवाणी केंद्राने रेडिओवर प्रसारित केली आहेत.
'सोयऱ्याला धडा शिकवा' - हुंडाप्रथेविरुद्ध असलेले कायदयाबद्दल समाजात जागरूकता
'हुंड्या पायी घडलासार' - हुंडाप्रथेचे दुष्परिणाम आणि निर्माण होणाऱ्या समस्या[३७]
'दारू सुटली चालना भेटली' - व्यसन मुक्तीतून होणारे फायदे तरुण पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी
'भंगले स्वप्न महाराष्ट्राचे' - छत्रपती राजाराम भोसले, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी मुघल साम्राज्याविरुद्ध केलेल्या संघर्षावर आधारित[३९].
'भक्त कबीर'
'सुशीला, मला माफ कर' - छोटू जुवेकर राज्य स्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेते वगनाट्य (सण १९८०)
'महात्मा फुल्यांची घेऊन स्फूर्ती, चला होऊया शाळेला भरती' .. राष्ट्रीय साक्षरता अभियानासाठी लिहिलेले हे गीत संगीतकार श्री राम कदम यांनी संगीतबद्ध केले आहे[४२]
मराठी चित्रपाटातील गाणी:
गंगाराम आला ....
मुरली माझा कष्ट करी ...
व्हीआयपी व्हीआयपी ... प्रसीद्ध गायक श्री कुणाल गांजावाला आणि संगीतकार रवि वयहोळे[४३]
कलावंतांच्या आठवणी [४५] ... महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळा तर्फे प्रकाशित, महाराष्ट्रातील लोककला आणि विविध कलावंतांच्या योगदानाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी संदर्भ म्हणून उपयुक्त[४६].
भंगले स्वप्न महाराष्ट्राचे (ऐतिहासिक नाटक) .... त्रिदल प्रकाशन, पुणे द्वारा प्रकाशित
प्रेम स्वरूप आई (कविता संग्रह) [४७] .... श्री राजेंद्र कांकरिया यांनी संग्रहित केलेला काव्यसंग्रह
अक्षरमंच (कविता संग्रह) ... अखिल भारतीय मराठी प्रातिनिधिक कवितासंग्रह - २००४, संपादक डॉ योगेश जोशी
पुरस्कार आणि मान्यता
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार (२०१९) [४८] - श्री विनोद तावडे, मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत
मुस्लिम सत्यशोधक मंडळ विशेष सन्मान (२०१९) [४९] - सामाजिक कार्यकर्ते श्री बाबा आढाव यांच्या हस्ते प्रदान
ग्रँड सोशल अवार्ड, पुणे (२०१३) - [५६]हिंदी चित्रपट अभिनेते श्री जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते प्रदान
व्यसनमुक्ति पुरस्कार (२००३) - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान
लोकशाहीर पुरस्कार (१ ९९९) - 'आश्वासन समिती-महाराष्ट्र राज्य विधानसभा'चे अध्यक्ष श्री बापूसाहेब गावडे यांच्या हस्ते प्रदान
ग्रामवैभव पुरस्कार (१९८१) - ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते स्व.श्री निळू फुले यांच्या हस्ते प्रदान [५७]
छोटू जुवेकर पुरस्कार, मुंबई (१९८०) [५८] - हिंदी चित्रपट अभिनेते श्री अमोल पालेकर यांच्या हस्ते प्रदान
सामाजिक कार्य
मोमीन कवठेकर यांनी एक कलापथक स्थापन केले आणि त्या माध्यमातून हुंडाबंदी, दारूबंदी, एड्स,अंधश्रद्धा अशा ज्वलंत विषयांवर जण जागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पथनाट्ये सादर केली[५९][६०][६१]. त्यांनी 'प्रौढ साक्षरता अभियान / राष्ट्रीय साक्षरता मिशन’, ‘व्यसनमुक्ती अभियान', ‘ग्राम स्वच्छता अभियान', 'तंटामुक्ती अभियान' अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. सामाजिक कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दाखल घेऊन त्यांना शासनाने ‘व्यसनमुक्ति पुरस्कार' देऊन सन्मानित केले[६२].
तमाशा आणि लोक कलावंतांच्या अडचणी सोडवण्याच्या उद्देशाने त्यांनी 'महाराष्ट्र राज्य तमाशा कला व कलावंत संघटना' स्थापन केली. कलाकारांच्या मुलांसाठी शाळा, विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती
[६३][६४]व वृद्ध कलाकारांना निवृत्तीवेतन/ मानधन मिळावे यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला[६५][६६]. पुणे जिल्ह्यातील कलावंतासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करीत असत[६७]. मराठी मातीतील या ग्रामीण लोककला आणि कलाकारांच्या योगदानाचे संवर्धन व्हावे आणि या मराठमोळ्या संस्कृतीचे योग्य प्रकारे जतन करून ती पुढील पिढीला उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी पुढाकार घेतला[६८][६९].
गेल्या दोन दशकांपासून ते उदयोन्मुख कलावंतांना शिबिरा द्वारे आणि प्रसंगी, वैक्तिक स्वरूपाचे मार्गदर्शन विनामूल्य करीत असत[७०]. महाराष्ट्राच्या या पारंपारिक कला प्रकारांचे आणि त्यामाध्यमातून मराठी संस्कृतीचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे[७१].
१९७५ मध्ये आणिबाणी च्या माध्यमातून भारतीय लोकशाहीला खीळ घालण्यात आली आणि अशा कठीण प्रसंगी, बशीर मोमीन यांनी 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' हे ऐतिहासिक संदर्भ असेलेले नाटक लिहिले आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुणे येथे रंगमंचावर सादर केले. हे नाटक प्रतिकात्मक स्वरूपात, तत्कालीन दिल्ली सरकारने लोकशाही वर केलेल्या आक्रमणाला धैर्याने परतवून लावण्यासाठी जनतेला प्रेरणा देणारे ठरले. अशाप्रकारे, बशीर मोमीन आणि 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' या नाटकाचे व त्यांच्या सहकलाकारांचे, आणीबाणी विरोधी आंदोलनात आणि लोकशाही पुनः प्रस्थापित करण्यासाठीच्या लढ्यात देखिल महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
^"लोकाश्रय लाभलेले लोकशाहीर बी. के. मोमीन-कवठेकर", “दै. पुढारी, पुणे”, २३-एप्रिल-२०१५
^प्रा. पंड्या, दयुती (नोव्हेंबर 30, 2022). "अध्याय 29: Folk artists of Gujrat and Maharashtra". In डॉ. मुकादम, केदार (ed.). भारतीय लोक कलाकार. महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा. pp. 141–145.
^गरुड, श्यामल (14-Apr-2024). कनातीच्या मागे. ललित पब्लिकेशन्स. ISBN978-81-959479-6-9 Check |isbn= value: checksum (सहाय्य). 2024-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-08-11 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
^डॉ. बोकील, नीलम (नोव्हेंबर 30, 2022). "अध्याय 18: महाराष्ट्रका लोक संगीत एवं लोक कलाकार". In डॉ. मुकादम, केदार (ed.). भारतीय लोक कलाकार. महाराजा सयाजीराव विश्वविद्यापीठ, बडोदा. pp. 85–90.
^"लोककला जिवंत ठेवणारी लेखणी विसावली", ‘दै. लोकमत- पुणे’, दि. १४-नोव्हेंबर-२०२१
^"लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे बशीर मोमीन कवठेकर", ‘सांज महानगरी-मुंबई आवृत्ती', दि. २२ जानेवारी २०१९