प्राणायाम

प्राण या वैश्विक चैतन्यशक्तीचे नियमन. प्राणायाम ही अष्टांगयोगातील चौथी पायरी आहे.

प्राणाचे विविध अवयवांतील प्रमाण असंतुलित झाल्याने शरिरात रोग उत्पन्न होतात. प्राणायामामुळे प्राण शक्ती संतुलित होऊन रोगांचा नाश होतो.

श्वासोच्छवासाच्या नियमनाने प्राणायाम साधता येतो.

प्राणायामातील पारिभाषिक शब्द

पूरक - श्वास आत घेणे.

कुंभक - श्वास आत किंवा बाहेर काही काळ थांबवून (कोंडून) ठेवणे.

रेचक - श्वास संथपणे बाहेर सोडणे. []

प्राणायाम म्हणजे काय?

प्राणायाम म्हणजे शरीर, इंद्रिये आणि मन निर्दोष व निरोगी ठेवून समाधीकरिता आवश्यक असलेली योग्यता निर्माण करण्याची साधना. योगसाधनेचा हा एक भाग होय. पतंजलीच्या योगदर्शनात योगाची जी यम, नियम, आसन, प्राणयाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही आठ अंगे क्रमाने सांगितली आहेत, त्यांपैकी चौथे अंग प्राणायाम होय.


प्राण म्हणजे श्वासोच्छ्‌वासातला वायू. प्राणाचा वा श्वासोच्छ्‌वासांचा आयाम म्हणजे गति-विच्छेद, अशी पातंजलयोगसूत्रात (२/४९) प्राणायामाची व्याख्या सांगितली आहे.

मनुस्मृतीत (६·७१) म्हणले आहे, की भट्टीत टाकलेले लोखंडादी धातू जसे भात्याने शुद्ध होतात, त्याप्रमाणे इंद्रियांचे मळ प्राणायामाने नष्ट होऊन इंद्रिये शुद्ध होतात.

योगसूत्रात म्हणले आहे, की ज्ञानावरचे आवरण प्राणायामाने क्षीण होऊन मनाला एकाग्रतेची योग्यता प्राप्त होते. (२/५२, ५३). हठयोगाच्या परिभाषेप्रमाणे आसने व प्राणायाम यांनी सर्व नाडींची शुद्धी होते. नाडी म्हणजे मज्जातंतू, असा कुवलयानंद अर्थ करतात. उदा., सुषुम्ना नाडी म्हणजे पृष्ठवंशातून गेलेला मज्जातंतू.

हठयोगप्रदीपिकेत म्हणले आहे, की प्राणायामाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या साधकाने शरीर निरोगी असेल, तरच प्राणायामाचा अभ्यास सुरू करावा. हितकारक, सात्त्विक मिताहाराची सवय असावी. पोट प्राणायामाच्या प्रारंभी साफ असावे. जिभेचे चोचले पुरविणाऱ्या तळलेल्या, तिखट, आंबट, जड अशा पदार्थांचे सेवन करू नये. मन प्रक्षुब्ध होईल असे वादविवाद किंवा भांडणाचे प्रसंग टाळावेत. शक्यतो ज्या ठिकाणी गर्दी असते तेथे मिसळू नये, म्हणजे जनसंगपरित्याग करावा. तत्त्वचिंतनपर ग्रंथांचे अध्ययन करावे. इंद्रियसंयम नियमितपणे पाळावा. शरीर स्वच्छ ठेवावे. अंतःकरण शांत व निर्विकार ठेवावे. प्राणायामाचे स्थान निवांत, एकांत, स्वच्छ असावे. वारा, पाऊस, ऊन, थंडी इत्यादिकांचा त्रास नसलेले निरामय असे असावे.

श्रीअरविंद म्हणतात, ज्या गतिशील ऊर्जेमुळे हे ब्रह्मांड चालत राहाते त्या प्राणिक शक्तीवर प्रभुत्व म्हणजे 'प्राणायाम'.[]

षट्‌क्रिया

धौती, बस्ती, नेती, त्राटक, नौली आणि कपालभाती या सहा क्रिया होत. जो मनुष्य स्थूल आणि कफदोषी असेल त्याने षट्‌क्रियांपैकी आवश्यक त्या क्रिया करून शरीराचे स्थौल्य कमी करावे व कफदोष नाहीसा करावा. काहींच्या मते सर्वांनीच षट्‌क्रियांपैकी आवश्यक ती कर्मे करून शरीर शुद्ध ठेवावे आणि नंतर अभ्यासास प्रारंभ करावा. परंतु या उलट काही योग्यांचे मत असे आहे, की योगासनाने व प्राणायामानेच कफादी दोष जातात आणि स्थौल्य नाहीसे होते. म्हणून षट्‌क्रियांची आवश्यकता नाही.

धौती

सकाळी, चार अंगुले (दोन विती) रुंद आणि १२ हात लांब असा तलम वस्त्राचा पट्टा निर्मळ स्वच्छ पाण्यात बुडवून शेवटचे टोक हातात बोटामध्ये पक्के धरून गिळण्याचा प्रयत्न करावा. काही दिवस गिळताना प्रथम ओकारी येते परंतु प्रयत्नान्ती सवय होते. हा पट्टा काही दिवसांनी अभ्यासानंतर पूर्ण गिळता येतो. गिळल्यानंतर काही मिनिटे पोटात ठेवून हळूहळू बाहेर काढावा. त्याला लडबडून घशातला व पोटातला कफ बाहेर पडतो. पट्टा पोटात असताना अन्नाशयाचे नैसर्गिक रीतीने आपोआप मर्दन होते कारण कोठ्यातील स्नायूंचे स्वाभाविक चलनवलन सुरू होते. सूक्ष्म रुधिराभिसरण होऊन कोठ्याला शक्ती येते कफदोष नाहीसा होतो.

बस्ती

छातीइतक्या पाण्यामध्ये स्थिर जलप्रवाहात रोज उभे राहून गुदद्वारामध्ये गुळगुळीत अशी सहा इंची नळी घालावी उड्डियान बंध करावा पाणी आत घ्यावे आणि सोडावे. गुदद्वाराने मलाशयात पाणी जाते आणि मळ निघून जातो. गुदद्वारातील आतड्यांचा संकोच-विकास होऊन मलाशयाला बळ येते.

नेती

रोज नाकाच्या प्रत्येक छिद्रातून रेशमासारखा मऊ बारीक दोरा घालून घशातून काढावा असे दोन्ही नाकपुड्यांतून करावे, त्यामुळे तेथील स्नायूंची हालचाल होऊन कपालशुद्धी होते आणि दृष्टिदोष उत्पन्न होत नाहीत.

त्राटक

भिंतीवरील किंवा फळ्यावरील बारीक छिद्रावर किंवा टिंबावर दृष्टी रोज एकग्र करून नेत्रातून अश्रूपात होईपर्यंत पहात राहावे त्यामुळे नेत्ररोग होत नाहीत. दृष्टीवरील झापड, तंद्रा, आळस वगैरे नष्ट होतात.

नौली

उभे राहून दोन्ही पाय समांतर ठेवावेत. किंचित ओणवे व्हावे. पोट खपाटीस न्यावे. पोटाच्या मधले दोन स्नायू वेगळे करून ताठ करावेत आणि असे वेगळे करण्याची सवय झाल्यावर डावीउजवीकडे सारखे फिरवावेत. याच्या योगाने अन्ननलिकांची पचनशक्ती वाढते.

कपालभाती

मऊ आसनावर पद्मासन घालून ताठ बसावे आणि मान ताठ ठेवून लोहाराच्या भात्याप्रमाणे नाकाने श्वास वेगाने आत घ्यावा, तो आपोआप घेतला जातोच आणि लगेच न थांबता नाकानेच सोडावा. श्रम वाटेपर्यंत हा नाकाचा भाता तोंड मिटून सुरू ठेवावा. कपालभाती हा एक प्रकारचा प्राणायामच आहे, असे म्हणता येते. कपालभाती करताना मुख्यतः नाकातील, घशातील आणि छातीतील स्नायू व मज्जातंतू यांना व्यायाम घडत असतो. मेंदू आणि कान, डोळे, नाक व घसा यांच्यातील दोषांची शुद्धी होते. कारण या भागातील रुधिराभिसरण वेगाने होते आणि रुधिरामधून मेंदूस व मज्जातंतूस आवश्यक असलेल्या ऑक्सिजन वायूचा भरपूर पुरवठा होतो


प्राणायामाचे दोन प्रकार – अमंत्रक आणि समंत्रक.

अमंत्रक म्हणजे मंत्रावाचून करावयाचा

समंत्रक म्हणजे मंत्रासह उदा., वेदाध्ययनाचा अधिकार असलेल्या त्रैवर्णिकांनी खालील सव्याहृतिक, सशिरस्क गायत्रीमंत्र जपायचा असतो, तो असा : ॐ भूर्भुवः स्वः महः जनः तपः सत्यम्’ या सात व्याहृती उच्चारून नंतर प्रणवोच्चारपूर्वक गायत्रीमंत्र उच्चारायचा आणि गायत्रीमंत्राच्या शेवटी ‘ॐ आपोज्योती रसोऽमृतं ब्रह्म भूर्भवस स्वरोम्’ हे शिरस् (टोक) जोडायचे. किंवा ज्या साधकाची जी उपास्य देवता असेल त्या उपास्य देवतेचा मंत्र प्राणायामाच्या वेळी देवतेच्या अनुग्रहाकरिता जपायचा असतो.

संदर्भ

[]

अष्टांग योग
यमनियमआसनप्राणायामप्रत्याहारधारणासमाधी



  1. ^ स्वामी स्वरूपानंद (१९६०). श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी (उत्तरार्ध). पावस: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस.
  2. ^ Sri Aurobindo (2003). Early Cultural Writings. THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 01. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.
  3. ^ "प्राणायामाचे प्रकार".

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!