पूर्ण

आयुष्मान पूर्ण (पाली- पुण्ण) (सुमारे इ.स. पूर्व ४९८) हे गौतम बुद्धांचे समकालीन बौद्ध भिक्षू होते. महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा उपदेश प्रसारित करणारे ते प्रथम भिक्षू मानले जातात.[] मज्झिमनिकायाच्या पुण्णोवाद सुत्तामध्ये यांचा उल्लेख आला आहे.

पूर्ण यांचा जन्म सूनापरान्त प्रांतामध्ये सुप्पारक येथे एका व्यापारी कुटुंबात झाला. डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या मते सूनापरान्त हा प्रांत ठाणे जिल्ह्यातील नालासोपारा विहाराचा व दक्षिण गुजरातचा भाग असावा.[] आपल्या सहकाऱ्यांबरोबर व्यापारासाठी श्रावस्ती येथे गेले असता त्यांना गौतम बुद्धांचे प्रवचन ऐकण्याची संधी मिळाली. अशी अनेक प्रवचने ऐकल्यानंतर त्यांच्या मनात वैराग्याची भावना निर्माण हौऊन त्यांनी गौतम बुद्धांकडे प्रव्रज्येची मागणी केली. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी बुद्धाकडे परत आपल्या प्रदेशात जाण्याची मागणी केली. बुद्धांनी त्यांना संक्षिप्त उपदेश देऊन त्यांना आपल्या प्रांतात जाण्याची अनुमती दिली.

पूर्ण यांनी आपल्या प्रांतात एकाच वर्षात ५०० स्त्री-पुरुषांना बौद्ध धर्माच्या उपासकांची दीक्षा दिली. पूर्ण यांनी त्यांना दानात मिळालेल्या रक्तचंदनाच्या काष्ठांची एक गंधकुटी तयार करून गौतम बुद्धांना आपल्या प्रांतात भेटीस येण्याची विनंती केली. असे म्हणले जाते की बुद्ध या विनंतीस मान देऊन आपल्या ५०० अनुयायांसह एका रात्री करिता सुप्पारक येथे वास्तव्यास आले होते. सकाळ होताच ते निघून गेले.[]

आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत पूर्ण यांनी आपल्या प्रांतात धर्मप्रचार-प्रसाराचे कार्य केले. त्यांच्या मृत्यूची बातमी बुद्धांना मिळाल्यावर बुद्धांनी त्यांच्याविषयी "पूर्ण एक कुलपुत्र पंडित होता. त्यास परिनिर्वाण प्राप्त झाले" असे उद्गार काढले.[]


संदर्भ

  1. ^ डॉ. भिक्क्षु मेधांकर, बुद्ध और उनके समकालीन भिक्खू, नागपूर: बुद्धभूमी प्रकाशन.
  2. ^ साळुंखे, आ. ह. (२००७, पुनर्मुद्रण फेब्रुवारी २०१०) सर्वोत्तम भूमिपुत्र: गोतम बुद्ध सातारा: लोकायत प्रकाशन, पृष्ठ ४८४-४८६.
  3. ^ खुद्दकनिकाय अट्ठकथा
  4. ^ मज्झिमनिकाय, पुण्णोवाद सुत्त

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!