थॉमस पेन (२९ जानेवारी, इ.स. १७३७[१] - ८ जून, इ.स. १८०९) हा एक ब्रिटिश-अमेरिकन लेखक तसेच मानवी हक्कांच्याबाबत भाष्य करणारा जगाच्या इतिहासातील पहिला विचारवंत होता. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याची गणना होते.[२] मानवी अधिकारांचे शास्त्रशुद्ध विवेचन त्याने 'मानवी हक्क' या ग्रंथात केले आहे. स्वातंत्र्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांना या ग्रंथाने प्रेरणा दिली.
बालपण
इंग्लंडमधील नॉरफोक परगण्यातील थेटफोर्ड येथे इ.स. १७३७ साली थॉमस पेनचा जन्म झाला. त्याचा बाप कर्मठ क्वेक्कर पंथाचा होता. वयाच्या तेराव्या वर्षी शाळा सोडून बापाच्या कापड बनविण्याच्या धंद्यात तो मदत करू लागला. याच काळात जहाजावर खलाशी होण्यासाठी तो दोनवेळा घरातून पळून गेला होता पण दोन्ही वेळेस त्याच्या बापाने त्याला परत आणले.
प्रारंभिक जीवन
थॉमस पेनने सुरुवातीला काही काळ अबकारी खात्यात नोकरी केली. तेथून त्याला काढून टाकल्यावर त्याने काही दिवस बापाचा पारंपारिक कापडाचा व्यवसाय केल्यानंतर त्याला अबकारी खात्यात परत घेण्यात आले. ज्या अबकारी खात्यात तो नोकरी करीत होता त्याच खात्यात भ्रष्टाचार कसा बोकाळला आहे यावर थॉमस पेनने आपल्याच खात्याला एक निवेदन दिले. हे निवेदन दिल्यानंतर त्याचे निवेदन तर फेटाळले गेलेच उलट कामात दुर्लक्ष केल्याबद्दल त्याला नोकरीवरून कमी करण्यात आले. याच काळात त्याची बायकोही त्याच्यापासून विभक्त झाली. या एकाकी अवस्थेत असताना त्यावेळी इंग्लंडमध्ये अमेरिकन वसाहतीतर्फे कारभार पाहणाऱ्या बेंजामिन फ्रॅंकलिनशी थॉमस पेनची ओळख झाली. फ्रॅंकलिनने एक शिफारसपत्र देऊन पेनला आपल्या जावयाकडे अमेरिकेला पाठविले आणि इ.स. १७७४ साली वयाच्या सदोतिसाव्या वर्षी पेन अमेरिकेत आला.
कार्य
अमेरीकेत गेल्यानंतर थॉमस पेनने स्थानिक वर्तमानपत्राचा संपादक म्हणून तिथे काम करण्यास प्रारंभ केला. संपादक म्हणून पेनने निग्रोंच्या गुलामगिरीविरूद्ध, स्त्रियांच्या समान हक्कांबद्दल आणि एकूण लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्य यांचे पक्ष मांडायला सुरुवात केली. इ.स. १७७५ मध्ये त्याने कॉमन सेन्स ही पुस्तिका लिहायला सुरुवात केली. अमेरीकन वसाहती इंग्लंडच्या अधिपत्यापासून स्वतंत्र होणे गरजेचेच नाही तर अपरीहार्य आहे असा पक्ष मांडणारे त्याचे हे सत्तेचाळीस पानांचे पुस्तक १० जानेवारी, इ.स. १७७६ रोजी प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सहा महिन्यांच्या आत अमेरिकेत संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव करण्यात आला.
त्यानंतर काही महिन्यातच अमेरिकन काँग्रेसने त्याला बोलावून घेतले व स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिकन राष्ट्राच्या परराष्ट्रखात्याचा पहिला सचिव झाला. नव्याने स्वतंत्र झालेल्या अमेरिकन संयुक्त संस्थानाने फ्रान्समधून आर्थिक मदत मिळविण्यासाठी त्याला पाठविले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी पेन युरोपमध्ये परतला आणि पुढे जवळजवळ पंधरा वर्षे तिथे राहिला. एडमंड बर्कच्या फ्रेंच क्रांतिविरोधी लिखाणास उत्तर देण्यासाठी 'राईट्स ऑफ मॅन' (मनुष्यप्राण्याचे हक्क़) ही दुसरी पुस्तिका त्याने प्रसिद्ध केली.
राजद्रोहाबद्दल अटक होण्याचा धोका निर्माण झाला त्यावेळी थॉमस पेन इंग्लंड सोडून फ्रान्समध्ये आला. तिथेही सोळाव्या लुईचा शिरच्छेद करण्यास विरोध केल्यामुळे जहाल क्रांतिकारक त्याच्यावर नाराज झाले. फ्रन्समधील सत्ता जहालांच्या हाती आल्यानंतर पेनला तुरुंगात टाकण्यात आले व त्याचे फ्रेंच नागरिकत्वही रद्द करण्यात आले. पेनच्या शिरच्छेदाची सगळी तयारी झाली होती पण ऐनवेळी फ्रान्समधील अमेरिकन राजदूताने त्याची तुरुंगातून सोडवणूक करून घेतली.
इ.स. १८०२ साली पेन अमेरिकेत परतला. अमेरिकन स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या पेनला तो अमेरिकन नागरिक नाही या सबबीखाली मतदानाचा हक्कही नाकारण्यात आला. यानंतर सात वर्षे दारिद्र्य, शारीरिक व्याधी, सामाजिक बहिष्कार यांना तोंड देत तो जगला. बहात्तराव्या वर्षी इ.स. १८०९ साली तो मेल्यावर त्याला बापाच्या क्वेक्कर पंथियांनी त्यांच्या स्मशानभूमीत गाडण्याची परवानगीही नाकारली.
इ.स. १९४५ साली अखेरीस थॉमस पेनला अमेरिकन नागरिकत्वाचे हक्क मरणोपरांत देण्यात आले.[३]
संदर्भ आणि नोंदी