थॅनोस हा मार्व्हल कॉमिक्सच्या अमेरिकन कॉमिक पुस्तकांमध्ये दिसणारा एक सुपरव्हिलन आहे. लेखक-कलाकार जिम स्टारलिन यांनी तयार केलेले हे पात्र प्रथम द इनव्हिन्सिबल आयर्न मॅन #५५ ( १९७३) मध्ये दिसले. टायटन नावाच्या चंद्राचा एक सरदार असलेला थानोस हा मार्वल युनिव्हर्समधील सर्वात शक्तिशाली प्राणी म्हणून ओळखला जातो. अॅव्हेंजर्स, गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी, द फॅन्टॅस्टिक फोर, द इटरनल्स आणि एक्स-मेन यांसह अनेक नायकांशी त्याने संघर्ष केला आहे.
थॅनोस तयार करताना स्टारलिनने डीसी कॉमिक्सच्या जॅक किर्बीच्या न्यू गॉड्स मालिकेपासून विशेषतः डार्कसीडचे पात्रापासून प्रेरणा घेतली. थॅनोसला सामान्यतः खलनायक म्हणून चित्रित केले जात असले तरी अनेक कथांमध्ये त्याच्या कृती न्याय्य असल्याचे मानले जाते. या पात्राचे सर्वात प्रसिद्ध कथानक म्हणजे द इन्फिनिटी गॉन्टलेट (१९९१) हे आहे. यामध्ये अनेक कथांचा कळस आहे, ज्यामध्ये तो सहा इन्फिनिटी रत्ने गोळा करताना दिसतो. ही रत्ने एकत्रित वापरून त्याला विश्वाच्या अर्ध्या लोकसंख्येला मारायचे असते, ज्यामध्ये अनेक नायकांचा देखील समावेश आहे. हे काम करून मिस्ट्रेस डेथ (मार्वल युनिव्हर्समधील मृत्यूचे जिवंत मूर्त स्वरूप) आकर्षित होण्याची अपेक्षा असते. परंतु हे काम नंतर उलटवले जाते. हे कथानक मार्वलने प्रकाशित केलेल्या सर्वात लोकप्रिय असलेल्या कामांपैकी एक राहिले आहे.
कॉमिक बुक्सच्या कांस्य युगात पदार्पण करताना हे पात्र जवळजवळ पाच दशकांच्या मार्वल प्रकाशनांमध्ये दिसले आहे. तसेच अॅनिमेटेड दूरदर्शन मालिका आणि व्हिडिओ गेमसह अनेक माध्यम रूपांतरांमध्ये थॅनोस दिसत आला आहे.