त्र्यं.सी. कारखानीस

त्र्यंबक सीताराम कारखानीस (जन्म : महाड, १५ एप्रिल इ.स. १८७४; - पुणे, ८ जानेवारी, इ.स. १९५६) हे एक मराठी नाट्य अभिनेते, नाट्यशिक्षक, नाट्यदिग्दर्शक आणि नाटककार होते. त्यांचे शालेय शिक्षण महाड आणि पुणे येथे झाले. मात्र कौटुंबिक अडचणीमुळी कॉलेजचे शिक्षण अर्धवटच राहिले.

पुण्यातील न्य़ू इंग्लिश स्कूलमधील शिक्षकाची नोकरी सोडून, सर्वसामान्य जनतेसमोर तेजस्वी आदर्श चांगल्या संस्कृतीचा ठसा उमटावा व त्यांच्यात वाङ्‌मयीन अभिरुची निर्माण व्हावी म्हणून त्र्यं.सी. कारखानीस यांनी ’महाराष्ट्र नाटक मंडळी’ स्थापन केली आणि तिच्या मार्फत ’कांचनगडची मोहना’ या खाडिलकरांच्या नाटकाचा प्रयोग त्यांनी सादर केला. नाटकात त्यांनी हंबीररावांची भूमिका केली होती. कारखानिसांनी सहकारी तत्त्वावर महाराष्ट्र नाटक मंडळी चालविली व तिला समाजात चांगली प्रतिष्ठा मिळवून दिली. ही नाटक कंपनी त्यांनी १९०४ ते १९१९ पर्यंत यशस्वीपणे चालविली.

त्यानंतर गडकरी, देवल औंधकर, खरे इत्यादी नामवंत नाटककारांची पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा विविध स्वरूपांची सोळा नाटके कारखानिसांनी रंगभूमीवर आणली.

अनेक नाटकांतून भूमिका करत असताना आपण काहीतरी वेगळे करावे असे त्यांना वाटे. आपल्याला ज्या प्रकारची भूमिका करावयाची आहे, त्याप्रकारची भूमिका असलेले नाटक कुणीतरी लिहावे आणि आपण ती भूमिका सर्व ताकदीनुसार दमदारपणे रंगमंचावर सादर करावी असे त्यांना वाटे. पण त्या काळी नाट्यकलेचा पुरेसा विकास झाला नसल्याने कारखानिसांची ती इच्छा पूर्ण होऊ शकत नव्हती. शेवटी आपणच तसे नाटक लिहावे, या विचाराने ते नाटककार झाले. ’राजाचे बंड’ हे त्यांचे वेगळ्या प्रकारचे पहिले नाटक खूप गाजले. त्या यशानंतर त्यांनी अनेक नाटके लिहिली आणि रंगभूमीवर यशस्वी करून दाखवली.

लेखन

नाट्यलेखनाखेरीज लघुकथा, निबंध, नाट्यविषयक लेख, कविता व स्मृतिचित्रे इत्यादी विविध साहित्यप्रकार कारखानिसांनी हाताळले आहेत.

कादंबऱ्या

  • मैनाताईचा हलवा
  • वेणीसंहार

व्यासंग

त्र्यं.सी. कारखानीस यांचा अर्थकारण, ज्योतिष, तत्त्वज्ञान, मार्क्सवाद, राजकारण, साहित्य, इत्यादी विषयांचा मोठा व्यासंग होता. नाटक हे लोकशिक्षणाचे साधन आहे असे ते मानीत.

नाट्यशिक्षक

कारखानीस उत्कृष्ट नाट्यशिक्षकही होते. नटवर्य केशवराव दाते हे त्यांच्याच तालमीत तयार झाले. सुशिक्षित नट व अशिक्षित नट यांच्या नाट्यशिक्षणपद्धतीत फरक असावा, असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी नाटक मंडळीत एक ग्रंथालय काढून त्यात नाटके व नाट्यविषयक ग्रंथ यांचा संग्रह केला. नाटक मंडळीतर्फे विद्वानांची एक व्याख्यानमालाही एकदा त्यांनी आयोजित केली होती.

नाट्यमन्वंतर

निवृत्तीनंतरही त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. १९३३ मध्ये स्थापन झालेल्या ‘नाटयमन्वंतर’ या नव्या ध्येयाने प्रेरित झालेल्या नाट्यसंस्थेचे ते सल्लागार होते.

त्र्यं.सी. कारखानीस यांनी लिहिलेली नाटके

  • ठाकुरदादा (१९५०)
  • राजाचे बंड (१९२४)
  • स्वैरिणी (१९४५). (अंबाहरण या कथानकावर आधारलेले हे नाटक रंगमंचावर येऊ शकले नाही!)

त्र्यं.सी कारखानीस यांनी रंगमंचावर सादर केलेली यशस्वी नाटके

  • कांचनगडची मोहना (लेखक कृ.प्र. खाडिलकर)
  • शिवसंभव (लेखक वासुदेव वामन खरे)

त्र्यं.सी. कारखानीस यांचा अभिनय असलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)

  • कांचनगडची मोहना (हंबीरराव)
  • कीचकवध (विराट)
  • प्रेमसंन्यास (कमलाकर, जयंत)
  • भाऊबंदकी (सखारामबापू)
  • सवाई माधवरावांचा मृत्यू (माधवराव)

सन्मान

त्र्यं.सी. कारखानिसांनी नट आणि नाटककार म्हणून, आणि नाट्यसंस्था स्थापना करून, मराठी रंगभूमीची जी सेवा केली तिचे फळ म्हणून त्यांना नागपूर येथे इ.स. १९३९ साली भरलेल्या ३०व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!