त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.
निर्मिती
त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही नदीवर अवलंबून असते. या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते. एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते :
नदीतील गाळाचे प्रमाण
नदीचा मुखाजवळील वेग
सागराची खोली
त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्य
सागरप्रवाह
नदी समुद्राला जाऊन मिळताना नदीच्या शेवटच्या टप्प्यात नदीप्रवाहाचा वेग कमी होतो. वेग मंदावलेल्या प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदीच्या मुखाशी जमा होत जातात. खडी आणि वाळू जड असल्यामुळे सहसा ते सर्वांत पहिल्यांदा जमा होतात. माती हलकी असल्यामुळे समुद्रात आतपर्यंत वाहून नेली जाते. खाऱ्या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात व त्या गुठळ्यांमुळे माती जड होते आणि तळाशी जाऊन साचू लागते. अशा गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभुज प्रदेश तयार होतो. नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढून त्याला स्थैर्य देतात. बऱ्याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे अनेक फाटे पडल्यासारखा असतो. उंचीच्या दृष्टिकोनातून हा प्रदेश सखल मैदानी असतो. त्याची समुद्रसपाटीपासून उंची सहसा २० मीटरांपेक्षा जास्त नसते. त्रिभुज प्रदेशावर लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा फारसा परिणाम होताना आढळत नाही.
त्रिभुज प्रदेश : नदी जेथे समुद्रास अथवा सरोवरास मिळते तेव्हा मुखाशी गाळाचा सपाट प्रदेश निर्माण होतो त्यास त्रिभुज प्रदेश म्हणतात. तो ग्रिक भाषेतील Δ डेल्टा या अक्षरासारखा दिसतो म्हणून इंग्रजी भाषेत त्यास डेल्टा म्हणतात तर मराठीत त्रिभुज (त्रिकोणी) प्रदेश म्हणतात. नदीच्या मुखाशी उतार कमी झाल्याने संथ वाहणारे पाणी सर्व गाळ वाहू शकत नाही. त्यामुळे पात्रातच गाळ साचल्याने मुख भरून येते आणि नदीचे पाणी दुसऱ्या मुखाने नवा मार्ग काढून समुद्रास मिळते व कालांतराने ते मुखही गाळाने भरून आल्याने नदी तिसऱ्या मुखाने समुद्रास मिळते, त्यामुळे नदी बहुमुखी बनते. नदीच्या अशा मुखप्रवाहांस उपमुख म्हणतात.
नदीस जेथून उपमुख नद्या फुटतात तेथून त्रिभुज प्रदेश सुरू होतो. त्रिभुज प्रदेशातील जमीन सामान्यतः सखल असते. तिची उंची सहसा २० मी. पेक्षा जास्त नसते. काही उपमुख नद्या खोल पाण्याच्या, तर काही गाळाने भरलेल्या दिसतात. त्रिभुज प्रदेशाची निर्मिती नदीच्या गाळाचे प्रमाण, मुखाशी समुद्राची खोली, मुखाशी नदीचा वेग, समुद्रप्रवाह, पावसाचे प्रमाण व जलवाहन क्षेत्राची वैशिष्ट्ये इ. घटकांवर अवलंबून असते. म्हणूनच काही नद्यांस त्रिभुज प्रदेश नाहीत. उदा., ॲमेझॉन नदीचा वेग मुखाशी इतका जास्त आहे, की प्रवाह पुढे ५०० किमी. पर्यंत समुद्रात वाहतो. परिणामतः या नदीचा त्रिभुज प्रदेश लहान आहे. संथपणे उथळ कॅस्पियन समुद्रास मिळणाऱ्या व्होल्गाचा त्रिभुज प्रदेश विस्तीर्ण आहे. त्रिभुज प्रदेशाचे आकारावरून मुख्य तीन प्रकार पडतात. उथळ संथ पाण्यात परिपूर्ण सलग त्रिभुज प्रदेश बनतात त्यास ‘पंखा’ (कमानी) त्रिभुज प्रदेश म्हणतात. उदा., नाईलचा त्रिभुज प्रदेश. खोल समुद्रात तुटक विस्कळित त्रिभुज प्रदेश आढळतात त्यांस ‘खगपद’ त्रिभुज प्रदेश म्हणतात. उदा., मिसिसिपीचा त्रिभुज प्रदेश. मिसिसिपीचा त्रिभुज प्रदेश हा सर्वात मोठा (क्षेत्रफळ ३१,२०० चौ. किमी.) त्रिभुज प्रदेश आहे. तिसरा प्रकार ‘कुस्पेट डेल्टा’ नावाने ओळखला जातो. त्यात नदीमुखापासून शिंगासारखे दिसणारे संचयनाचे बांध वक्राकार दोन्ही बाजूंस वाढत जातात. उदा., टायबर नदीचा त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश सतत विस्तारत असतात आणि त्यामुळे नवीन जमीन तयार होते. व ती सुपीक असते. पूर व पाण्याचा निचरा ह्या त्रिभुज प्रदेशातील शेतीच्या समस्या होत. कराची, कलकत्ता, रंगून, बसरा, कैरो, न्यू ऑर्लीअन्स, ॲस्ट्राखान यांसारखी अनेक मोठी बंदरे आणि शहरे त्रिभुज प्रदेशात आढळतात व नदीखोऱ्याचा व्यापार त्यांद्वारे चालतो
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!