जांभळी पाणकोंबडी (शास्त्रीय नाव:Porphyrio porphyrio) (इंग्लिश:Indian purple moorhen, स्वाम्पहेन; हिंदी: कालीम, कैम, खारीम, खिमा, खेना, जलबोदरी, जामनी) हा पक्षी पाणकोंबडी प्रकारातील आहे. भारतात विपुल प्रमाणात आढळतो. नदीकाठ, दलदली, तळी ही या पक्ष्याची आवडती वसतीस्थाने आहेत. याच्या जांभळ्या रंगामुळे हा पक्षी चटकन दूरुनही ओळखू येऊ शकतो.
हा पक्षी आकाराने कोंबडीएवढा असतो.जांभळट निळ्या रंगाचा असतो. लांब तांबडे पाय,पायांची बोटे लांब असतात. कपाळ तांबडे त्यावर पिसे नसतात. चोच लहान, जाड व लाल रंगाची असते. भुंड्या शेपटीखाली पांढऱ्या रंगाचा डाग असतो. शेपटी खालीवर हलविण्याच्या तिच्या सवयीमुळे हा डाग ठळक दिसतो. नर-मादी दिसायला सारखे असतात. जोडीने किंवा मोठ्या समुहात आढळतात.
हा पक्षी भारतीय उपखंड, श्रीलंका, अंदमान आणि निकोबार बेटांत निवासी आहे आणि स्थानिक स्थलांतर करतो. याची वीण जून ते सप्टेंबर या काळात होते. केम दलदली, झिलाणी, देवनळ आणि सदाफुलीची बेटे यांत सापडतो.