गुहिलोत घराणे हे प्रमुख राजपूत घराण्यांपैकी एक घराणे होते. या घराण्यातील काही राजकर्त्यांनी राजस्थानच्या मेवाड प्रांतावर राज्य केले.
इतिहास
इ.स. ७१२ मध्ये अरबांनी हिंदुस्थानात स्वाऱ्यांना सुरुवात केली. सिंधच्या दाहीर राजांनी या स्वाऱ्यांना तोंड दिले पण फितुरीमुळे त्याचा घात होऊन सिंध प्रांत अरबांच्या ताब्यात गेला. इ.स. ७३९ मध्ये अरब राजस्थानकडे चाल करून येऊ लागले त्यावेळी चितोड येथील बाप्पा रावळ नावाच्या एका सेनापतीने अरबांचा एका मोठ्या युद्धात प्रचंड पराभव केला. या विजयामुळे बाप्पाला चितोडचे सार्वभौमपद मिळाले. बाप्पा रावळ हा गुहिलोत घराण्याचा पहिला प्रसिद्ध पुरूष होय.
राज्यकर्ते आणि कामगिरी
बाप्पा रावळाने अरबांना हिंदुस्थानच्या बाहेर हाकलून लावले आणि सिंधचा अमीर सेलिम याचा पाडाव करून त्याच्या मुलीशी लग्न केले. इ.स. ७६३ मध्ये अधिकारत्याग करून त्याने सन्यास घेतला.
बाप्पानंतर चितोडच्या गादीवर गुहिल हा राजा आला. गुहिलाने बाप्पा रावळापासून निघालेल्या शाखेस आपले नाव दिले त्यामुळे या घराण्याला गुहिलोत हे नाव पडले.
या घराण्यात गुहिलानंतर खुमान, अल्लट, नरवाहन, शक्तिकुमार, भीम, हमीर, सं, प्रताप हे राज्यकर्ते होऊन गेले. भोवताली मुसलमानी राज्य पसरत असतानाही आठशे वर्षे सातत्याने लढत राहून आपले स्वातंत्र्य कायम राखण्यात गुहिलोत घराण्यातील या राज्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.