महाराष्ट्रातील हिंदू गवळी समाज हा प्रामुख्याने उत्तर कोकणात रहाणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.
महाराष्ट्रात त्यांच्या व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हणले गेले असले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय हा भातशेती हाच आहे.
कोकणपट्टीतील भूमीपुत्र गवळी, कुणबी, आगरी या शेतकरी जातींचा पारंपरिक पोशाख.
पुरुष:- कमरेला रुमाल किंवा लंगोटी, अंगात बंडी, डोईला टोपी किंवा पागोटे.
स्त्रिया:- गुढग्यापर्यंत येणारे मांडकास पद्धतीने नेसलेले नऊवारी लुगडे.
कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.
स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित. त्याला 'मांडकास नेसणे’ असेही म्हणतात.
गौरी गणपती, शिमगा-होळी हे मुख्य सण. पुरुषांचा बाल्याचा नाच आणि स्त्रियांचा फेऱ्यांचा नाच हे नृत्यप्रकार.
तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळ्यांचे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.
स्थान
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.
याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे,नाशिक, हिंगोली,परभणी, अमरावती,बुलडाणा,जळगाव,अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.
इतिहास
मूळ सोमवंशी क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी श्रीकृष्ण हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण यदु कुलातील होता. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशातहोती. पुढे यदुवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.
श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंश) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादवकुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले. त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-
ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.
प्राचिन काळापासून गवळी हे कोकणातले मूळ रहिवासी आहेत. कोकणाचा ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, मराठेशाही आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी देवगिरीच्या यादवांनी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला त्या वेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला.
कोकणात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ” गवळी ” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली. कोकणातील यादव गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले.
शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळ पिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्या मुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्य वृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही.
इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवली गावचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवली गावचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पीचडोली गावचे चोगले खोत , महाड मधील सवाने गावाचे बांडागळे खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळी गावचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवली गावचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्या मुळे काही लोकांनी पुढे पुढे मराठेशाही सरकारात, इंग्रजलष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.
कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरात मध्ये वडोदर्यातील गायक्वाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.
सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.
खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले. व त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटिश सैन्यात हवालदार होते. व त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.
माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले.
गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.
कर्जत तालुक्यातील कै . नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुप्रीन्तेन्दंत ऑफ पोलीस या मोठ्या हुद्या पर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ” यादव शिक्षण प्रसारक मंडळी ” या नावाची संस्था काढली. असो अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.
कुणबी, आगरी, कराडी, वाडवळ, कुणबी-मराठा या गवळ्यांशी साधर्म्य असलेल्या जाती कोकणात आहेत. त्यापैकी कुणबी, आगरी व गवळी हे भातशेती करू लागले. मीठ पिकवण्याचा अधिकार आगरी या जातीकडेच होता. वसई, सोपारा, ठाणे, नागोठाणे, चौल, अलिबाग, दाभोळ परिसरांत त्यांनी वसाहती केल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीकाठी वसलेले चौल हे एक बंदर आहे. सोपारे-चेऊल हे बंदरही त्यावेळी प्रसिद्ध होते. बिंबराजाच्या पूर्वी कोकणामध्ये यादवांच्या वसाहती होत्या.
छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याच्या कालखंडात व नंतर मराठेशाहीच्या काळात गवळी, कुणबी, आगरी, कोळी समाजाने सहभाग व सहकार्य केले होते. आजही राजधानी रायगड किल्ल्याच्या आजूबाजूला गवळी समाजाची अनेक गावे आहेत.
गवळी समाजाबद्दल
भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून ‘गवळी’ हे नाव पडलेले आहे तरी मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्ये आगरातले गवळी (कोकणातले गवळी) आणि घाटावरचे गवळी असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणें आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शाली प्रमाणे पांघरून घेत असत.
जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी आणि सोबतच मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी,हे आहे.
सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळती जुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला "आजीस" किंवा "म्हातारी बय" आणि बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.
समाजाची दैवते
गवळी समाजाचे मुख्य दैवत बाळकृष्ण व भैरी (काळभैरव) हे होय. यांच्या कुलदेवतांमध्ये भैरी, खंडोबा, जोगेश्वरी, भवानी, एकविरा, सालबाई, मोठ्याबाया (सातआसरा), चेडोबा (रक्षकवीर) या मुख्य देवता आहेत. खंडोबा, भैरी (काळ भैरव), भवानी, एकविरा आई, वेताळ, जल आसरा बाया व इतर ग्राम देवता ह्यांना गवळी समाज आपले रक्षक व मार्गदर्शक देवता मानत आलाय.
गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.
कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, विन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.
समाजात कुलदैवताला घरचा देव बोलले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात. समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.
समाजाच्या रिती
गवळ्यांमध्ये लग्न समारंभ तांदूळ, हळद, लग्न असा तीन दिवस असतो. लग्नासाठी बसवलेले देव हे घराण्याच्या रितीप्रमाणे कोंबड्या किंवा बकऱ्याचा मानपान देऊन उठवले जातात. देवक हे आंबा किंवा उंबराच्या झाडाचे असते. मांडवात एका खांबाला आंब्याची, उंबराची फांदी बांधून तिची पूजा केली जाते. त्याला मुहूर्तमेढ किंवा उंबरमेढ म्हणतात. लग्नासाठी बसवलेले देव उठवल्यावर हळदउतरणी हा विधी होतो.
लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.
समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्त्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.
लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्त्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा सतिर (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.
कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही गवळी, कुणबी, आगरी-कोळी समाजात परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत गवळी समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रमान असतो. मुख्यत्वे सवाष्ण आणि विधवा असा भेद कमी केला जातो. बऱ्याच विधिमंध्ये विधवा महिला देखील सहभागी होऊ शकतात. लग्नसोहोळ्यात विधींची माहीतगार असणारी विधींची गीते (धवळे) गाणारी व्यक्ती ही विधवा स्त्री असेल तरी चालते. तिचा मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार संपूर्ण लग्नसमारंभ पार पडतो. यातून समाजातली मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.
समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, उटणे, हळद वैगरे मंगलविधी, देवक हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी,आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.
कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येत असे.
गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.