कर्दळीवन

कर्दळीवन आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिग क्षेत्राजवळचे ठिकाण आहे. अक्कलकोट स्वामींची बखर, गुरुचरित्र, द्विसहस्र गुरुचरित्र, पंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांचे चरित्र, श्रीपाद वल्लभ यांचे चरित्र, इत्यादी दत्त संप्रदायातील साहित्यामध्ये कर्दळीवनाचा उल्लेख आहे.

आख्यायिका

लौकिक अर्थाने खूप प्रसिद्धी झाल्यावर आणि आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर नृसिंह सरस्वती श्रीशैल्य येथे गेले. तेथे पाताळगंगेमध्ये जाऊन त्यांनी शिष्यांना ‘पुष्पाचे आसन’ करायला सांगितले. शिष्यांनी एक मोठी बांबूची टोपली तयार केली. त्याला सर्व बाजूंनी कर्दळीच्या पानांनी लपेटले. त्यावर शेवंती, कुमुद, मालती इ. फुले पसरून पुष्पासन तयार केले. त्या दिवशी गुरू कन्या राशीत होता, बहुधान्य नाम संवत्सर होते (शके १४४०), उत्तरायण सुरू होते. सूर्य कुंभ राशीत होता, माघ वद्य प्रतिपदा होती आणि शुक्रवार होता. त्या दिवशी प्रातःसमयी नृसिंह सरस्वती पुष्पासनावर बसले, पाताळगंगेतून कर्दळीवनाकडे गेले आणि दिसेनासे झाले. कर्दळीवनात सर्वत्र ते चैतन्यरूपाने राहत आहेत अशी समजूत आहे.

नृसिंह सरस्वती यांनी तेथे निबिड अरण्यात एका प्रशस्त ठिकाणी समाधीच्या स्थितीत राहण्याचे ठरविले. नीरव शांतता, उंचच उंच वृक्ष असलेल्या ठिकाणी एका पहाडाच्या कोपऱ्यात एक गुहा होती. त्या गुहेला लागून वटवृक्ष, औदुंबर आणि अश्वत्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढलेले होते. त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून ध्यानस्थ बसले. असे म्हणतात की ३५०हून अधिक वर्षे ते तेथे समाधी अवस्थेत बसून होते. त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराभोवतीही एक प्रचंड मोठे वारूळ तयार झाले होते. ते वारूळ त्यांच्या मस्तकाहूनही ८ ते १० फूट उंच झाले होते. वारुळामध्ये नागांचा मुक्त संचार होत होता. एके दिवशी एक चेंचू आदिवासी लाकूड तोडण्यासाठी त्या घनदाट जंगलात भटकत होता. भटकता भटकता जेथे श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून बसले होते तेथे आला आणि तेथील वृक्षावर त्याने घाव घातला. तो घाव चुकून त्या वारुळावर बसला आणि समाधी स्थितीत बसलेल्या श्री नृसिंहसरस्वतींच्या मांडीपर्यंत पोहोचला. तेथून भळाभळा रक्त वाहू लागले. श्री नृसिंह सरस्वतींची शेकडो वर्षांची समाधी त्यामुळे भंगली आणि ते त्या वारुळातून स्वामी समर्थरूपाने बाहेर पडले.

असे सांगितले जाते की अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना कलकत्ता येथे एका पारशी गृहस्थाने ‘आपण कोठून आलात?’ असा प्रश्न विचारला. स्वामी समर्थ स्वतःबद्दल कधीही आणि काहीही बोलत नसत. मात्र या वेळी स्वामींनी उत्तर दिले- ‘प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. पूर्व बंगाल हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. गंगातटाने फिरत फिरत हरिद्वार, केदारेश्वर आणि अखंड भारतातील सर्व भागातील प्रमुख गावे फिरलो.’ याचा अर्थ स्वामी समर्थ हे कर्दळीवनातून आले.

दत्तसंप्रदायातील सर्व परंपरांचा कर्दळीवनाशी अतूट असा संबंध आहे. पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे गुरू बालमुकुंद बालावधूत महाराज हेही अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्यजवळील कर्दळीवनामध्ये गेले, असा उल्लेख आहे. रामदासी परंपरेतील थोर विभूती दत्तावतार श्रीधरस्वामी यांनीही कर्दळीवनाची परिक्रमा केली होती.

कर्दळीवनाचा भूगोल आणि अन्य माहिती

कर्दळीवन हे ठिकाण आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिग क्षेत्राजवळ आहे. हैदराबादपासून २१० किमी अंतरावर श्रीशैल्य आहे. तेथे कृष्णा नदी पाताळगंगा या नावाने ओळखली जाते. हा सर्व परिसर अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेला आणि दुर्गम असा आहे. कर्दळीवनात चेंचुआ या जमातीचे आदिवासी लोक राहतात. कर्दळीवन परिक्रमेसंबंधी अनेक समज, अपसमज आणि श्रद्धा आहेत. इतर तीर्थक्षेत्री आपल्याला इच्छा झाली की लगेच जाता येते. कर्दळीवनात जाण्यासाठी अवधूतांची आणि स्वामींची इच्छा असल्याशिवाय जाता येत नाही, असे मानले जाते. भारतात दरवर्षी एक लाखातून एक व्यक्ती काशी-रामेश्वरला जाते, दहा लाखांतून एक बद्रीकेदारला जाते, २५ लाखांतून एक नर्मदा परिक्रमा करते, ५० लाखांतून एक कैलास मानस सरोवर यात्रेला जाते. मात्र कर्दळीवनात एक कोटीतून एखादीच भाग्यवान व्यक्ती जाऊ शकते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कर्दळीवनाविषयी लोकांना फार माहिती नाही. कर्दळीवन नवनाथ आणि नाथपंथी साधू, योगी यांचे साधनास्थळ आहे. तसेच ती सिद्धांची भूमी आहे. नागार्जुन, रत्‍नाकर इत्यादी सिद्धांची प्रयोगशाळा म्हणजे कर्दळीवन. कोणत्याही मूलद्रव्याचे सुवर्णामध्ये रूपांतर करायचे तंत्र त्यांनी विकसित केले होते, अशी समजूत आहे. कर्दळीवनात विलक्षण दैवी अनुभव येतात. वीरशैव समाजामध्येही कर्दळीवनाचे अपरंपार माहात्म्य असून कर्नाटकातील थोर संत अक्कमहादेवी यांनी कर्दळीवनामध्ये तपश्चर्या केली आणि त्या तेथेच मल्लिकार्जुनामध्ये विलीन झाल्या अशी श्रद्धा आहे. अशाप्रकारे श्रीदत्त संप्रदाय आणि इतरही आध्यात्मिक संप्रदायांमध्ये कर्दळीवनाचे विशेष माहात्म्य आहे.

कर्दळीवनात कसे जावे?

कर्दळीवनामध्ये जाणे थोडे अवघड आहे, मात्र अशक्य नाही. कर्दळीवनाच्या परिक्रमेमध्ये एकूण पाच स्थानी दर्शन घ्यावे लागते आणि मग आपली परिक्रमा पूर्ण होते. ही स्थाने म्हणजे अक्कमहादेवी मंदिर, व्यंकटेश किनारा, अक्कमहादेवी गुहा, स्वामी प्रकट स्थान आणि बिल्ववन (मार्कंडेय ऋषी तपस्थळ) ही आहेत. या परिक्रमेमध्ये एकूण ३६ कि.मी. चालावे लागते. शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि श्रद्धावान अशी कोणतीही व्यक्ती ही परिक्रमा सहजतेने पूर्ण करू शकते. स्त्री-पुरुष सर्व जण ही परिक्रमा करू शकतात. आध्यात्मिक अनुभूतींबरोबरच कर्दळीवनातील जैवविविधता, तेथील निसर्ग, गुहा, घनदाट जंगल हेही मुख्य आकर्षण आहे. तरुणाईसाठी कर्दळीवन परिक्रमा म्हणजे एक साहसी आध्यात्मिक ट्रेकिंग आणि पर्यटन आहे. परिक्रमेची सुरुवात आदल्या दिवशी श्रीशैल्य येथे पोहोचून श्रीमल्लिकार्जुन स्वामी आणि श्रीभ्रमरांबा माता देवीचे दर्शन घेऊन करावी लागते. पाताळगंगेतून बोटीने साधारण २८ कि.मी. प्रवास करून व्यंकटेश किनाऱ्याला पोहोचावे लागते. साधारणपणे नोव्हेंबर ते मे या काळामध्ये कर्दळीवन परिक्रमा करता येते. पावसाळ्यामध्ये तेथे जाता येत नाही.

कर्दळीवनाच्या यात्रेवरील पुस्तक

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!