ओसाका (जपानी: 大阪; उच्चार (सहाय्य·माहिती)) हे जपान देशामधील एक विशेष दर्जा असलेले शहर आहे. हे शहर जपानच्या होन्शू बेटावर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते ओसाका ह्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. २०१२ साली २८.७१ लाख लोकसंख्या असलेले ओसाका हे जपानमधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे (तोक्यो व योकोहामाखालोखाल). ओसाका-कोबे-क्योतो ह्या महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १.८८ कोटी असून ह्या बाबतीत ते जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचे तर जगातील तेराव्या क्रमांकाचे महानगर आहे.
जपानमधील सर्वात बलाढ्य आर्थिक केंद्रांपैकी ओसाका एक असून मित्सुबिशी, पॅनासॉनिक, शार्प, सॅन्यो इत्यादी अनेक जागतिक कंपन्यांची मुख्यालये ओसाकामध्ये अहेत.
वाहतूक
ओसाका महानगरात रेल्वेमार्गांचे मोठे जाळे असून येथील ओसाका मेट्रो जगातील आठव्या क्रमांकाची जलद परिवहन सेवा आहे. जपानच्या शिनकान्सेन ह्या द्रुतगती रेल्वेमार्गावरील ओसाका हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. तोकाइदो शिनकान्सेन सेवा ओसाकाला राजधानी टोकियोसोबत तर सॅन्यो शिनकान्सेन ओसाकाला पश्चिमेकडील फुकुओका शहरासोबत जोडते.
समुद्रामधील एका कृत्रीम बेटावर बांधण्यात आलेला कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ ओसाकामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून येथून जगातील अनेक प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
बाह्य दुवे