अणू म्हणजे सर्व द्रव्यात आढळणारी अतिसूक्ष्म संरचना होय. रासायनिक मूलद्रव्याच्या लहानात लहान कणास अणु असे म्हणतात. पदार्थ हा अति सूक्ष्म कणांचा (अणू) बनलेला असतो ही संकल्पना प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ कणाद याने मांडली.
अणू तीन प्रकारच्या कणांचे बनलेले असतात.
अणूच्या केंद्राला नुक्लेअस म्हणतात , तर त्यामधील न्युट्रॉन आणि प्रोटॉन यांना नुक्लेओन म्हणतात .अणू हे रसायनशास्त्रातील मूलभूत स्तंभ आहेत. रासायनिक प्रक्रियांमध्ये अणूंचे विभाजन होत नाही, अशा रासायनिक प्रक्रियांमध्ये फक्त भिन्न अणूंमधील रासायनिक बंधांमध्ये बदल घडतात. इंग्रजीमधील "ॲटम" हा शब्दाचा ग्रीक भाषेमधील अर्थ "पदार्थाचा अविभाज्य भाग" असाच आहे. विसाव्या शतकातील अणूसंशोधनानंतर काही भौतिक प्रक्रीयांमुळे अणूंचेही विभाजन होऊ शकते ह्याचा शोध लागला. अणुबॉंबचा स्फोट व अणुऊर्जा ह्या गोष्टी अशाच अणुप्रक्रीयांपासून करता येतात.
एखादे मूलद्रव्य त्याच्या अणूतील प्रोटॉनच्या संख्येवरून ओळखले जाते. पृथ्वीवर नैसर्गिक अवस्थेत फक्त ९२ (एकूण ११८ पैकी) मूलद्रव्ये आढळतात, बाकीची प्रयोगशाळेत तयार करता येतात. प्रत्येक शून्यभारीत अणूमध्ये त्याच्या प्रोटॉनच्या संख्येएवढेच इलेक्ट्रॉन असतात. जर असा समतोल नसेल तर त्यावर काही विद्युत भार असतो, अशा विद्युत भारीत अणूला आयन असे म्हणतात. एकाच मूलद्रव्याच्या भिन्न अणूंमधील न्युट्रॉनची संख्या वेगवेगळी असू शकते. मूलद्रव्यांच्या अशा स्वरूपांना समस्थानिके असे म्हणतात. उदाहरणार्थ, प्रोटियम (१ प्रोटॉन, ० न्युट्रॉन) आणि ड्युटेरियम (१ प्रोटॉन, १ न्युट्रॉन) ही हायड्रोजनची समस्थानिके आहेत.
अणू केंद्रकावर विविध कणांचा मारा करून नवीन मूलद्रव्ये प्रयोगशाळेत निर्माण केली जातात. पण अशी मूलद्रव्ये स्थिर राहू शकत नाहीत व त्यांचे स्थिर नैसर्गिक मूलद्रव्यात रूपांतर होते.
दोन किंवा अधिक अणूंमध्ये रासायनिक बंध तयार होऊन रेणू तयार होतात. उदाहरणार्थ, पाण्याच्या एका रेणूत हायड्रोजनचे दोन व ऑक्सिजनचा एक अणू असतात. युरेनियम अणुवर जर न्युट्रॉनचा मारा केला तर प्रंचंड प्रमाणात अणूऊर्जा तयार होते.