अंबिका हे महाभारतातील एक पात्र आहे. ती काशीच्या राजाची मुलगी आणि अंबा व अंबालिका यांची बहीण असते.
मुली मोठ्या झाल्यावर काशीचा राजा त्यांच्या स्वयंवराचे आयोजन करतो. हस्तिनापूरचा राजा विचित्रवीर्य याचा सावत्र भाऊ भीष्म याची इच्छा असते की त्याचा विवाह अंबा, अंबिका व अंबालिका यांच्याशी व्हावा. मात्र जुन्या वितुष्टामुळे काशीचा राजा हस्तिनापूर साम्राज्याला स्वयंवराचे आमत्रण देत नाही. तेव्हा क्रोधित होऊन भीष्म स्वयंवरात जातो व तेथील उपस्थित राजांना पराजित करून अंबा, अंबिका व अंबालिकाला घेऊन हस्तिनापूरला घेऊन येतो. मात्र अंबाने मनोमन शाल्व राजकुमाराला आपला पती मानले असल्यामुळे विचित्रवीर्याचे लग्न अंबिका व अंबालिकाशी होते.
मात्र लग्नानंतर लगेचच क्षयामुळे विचित्रवीर्याचा मृत्यू होतो. कुरू वंश टिकून राहावा यासाठी पुत्रप्राप्तीसाठी, अंबिकाची सासू (सत्यवती) अंबिकाला सत्यवतीचा जेष्ठ पुत्र व्यास यांच्याकडे पाठवते. मात्र महर्षी व्यासांचे उग्र रूप पाहून अंबिका एकदम घाबरून जाते आणि आपले डोळे मिटून घेते. यामुळे तिचा मुलगा धृतराष्ट्र अंधळा जन्मेल अशी भविष्यवाणी व्यास करतात. सत्यवती तिला परत एकदा व्यासांकडे जायला सांगते. मात्र यावेळेस घाबरून ती स्वतः न जाता आपल्या एका दासीला व्यासांकडे पाठविते. त्या दासीला विदुर नावाचा पुत्र नीतिनिपूण पुत्र होतो.